Latest News

हार्दिक पांड्याची इंस्टाग्राम पोस्टने पाकिस्तानी मंत्र्याला दिलं सडेतोड उत्तर!

भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या आशिया चषक सामन्यानंतर दुबईच्या मैदानावर मध्यरात्रीनंतर मोठा राडा झाला. भारताने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानी संघ एक तास त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये बसून राहिला. पाकिस्तानी संघाने जवळपास स्वत:ला कोंडूनच घेतलं. त्यानंतर उशीराने सुरु झालेल्या बक्षीस वितरण समारंभासाठी थांबून राहिलेल्या भारतीय संघाने आधी ठरल्याप्रमाणे काहीही झालं तरी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी यांच्याकडून चषक स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली.

नक्वी स्टेजवर असेपर्यंत आम्ही स्टेजवर येणार नाही असं म्हणत भारतीय क्रिकेटर्सने आपली मेडल्सही घेतली नाहीत. मात्र यानंतर नक्वी ट्रॉफी आणि मेडल घेऊन निघून गेले. त्यामुळे वाट पाहूनही भारतीय संघाच्या हाती ट्रॉफी आलीच नाही. मात्र भारतीय संघाचं सेलिब्रेशन थांबलं नाही. मात्र या सेलिब्रेशननंतर भारतीय खेळाडूंनी हक्काची ट्रॉफी नाकारणाऱ्या मोहसीन नक्वी यांना भन्नाट पद्धतीने ट्रोल केलं आहे.

ट्रॉफी शिवायही हार्दिकनं ट्रेण्ड सुरुच ठेवला तो असा
भारतीय संघाने ट्रॉफी जिंकल्यानंतर सामान्यपणे भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जिंकलेल्या ट्रॉफीसहीत पीचवर उभा राहून फोटो काढतो. 2024 च्या टी-20 वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकल्यानंतर हार्दिकने ट्रॉफी पीचवर ठेऊन आपल्याला काही ठाऊक नसल्याची पोज देत फोटो शूट केलं होतं. त्यानंतर याच वर्षी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये पीचवर चॅम्पियन्स ट्रॉफी ठेवून फोटो काढला होता. मात्र आता आशिया चषक जिंकल्यानंतर भारताने पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी पाकिस्तानच्या नक्वींच्या हस्ते चषक स्वीकारलाच नाही. त्यामुळे हार्दिकने त्याचा हा चषकासोबत फोटो काढण्याच्या ट्रेण्डमध्ये खंड पडू न देता अनोख्या पद्धतीने फोटो शूट केलं.

नक्वी हे सुद्धा ट्रॉफी घेऊन निघून गेल्याने भारतीय संघाने नो ट्रॉफी सेलिब्रेशन केलं. मात्र आता ट्रॉफी नसतानाच ट्रॉफीसोबतचा फोटो कसा काढायचा हा जुगाड हार्दिकने अगदी भन्नाट पद्धतीने केला. त्याने पिचवर उभं राहून फोटो काढला आणि नंतर बाजूला ट्रॉफीचा इमोजी लावून तो आपल्या इन्स्ट्रामवरुन शेअर केला. सध्या त्याचा हा भन्नाट फोटो सोशल मीडियावर ट्रेण्ड होतोय. नक्वी यांची हार्दिकने चांगलीच जिरवल्याची चाहत्यांमध्ये चर्चा आहे. या पोस्टमधून हार्दिकने पाकिस्तानी मंत्र्यांची लाज काढल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.

गिल आणि अभिषेकची पोस्ट
दुसरीकडे भारताचे सलामीवर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मानेही हातात ट्रॉफी पकडल्याचा पोज देत त्यावर ट्रॉफी इमोजी वापरुन इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या पोस्टला त्यांनी, “आम्ही कोण आहोत हे सिद्ध करण्यासाठी ट्रॉफीची गरज नाही,” अशी कॅप्शन दिली आहे.

सुर्याचा खोचक टोला
भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादवनेही अंतिम सामना जिंकवून देणाऱ्या तिलक वर्मासोबत ट्रॉफी पकडल्याच्या पोजमध्ये फोटो काढून घेत ट्रॉफीचा इमोजी लावून फोटो शेअर केलाय. या पोस्टला सुर्याने, “सामना संपल्यानंतर विजेता कोण आहे हे लक्षात ठेवतात ट्रॉफीचा फोटो नाही,” असा टोमणा मारला आहे.

भारताचा नक्वींना इशारा
दरम्यान, आशिया चषक आणि भारतीय संघाच्या खेळाडूंनी न स्वीकारलेली पदकं नक्वी हे स्वत: सोबत घेऊन गेल्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तातडीने भारताने जिंकलेली ट्रॉफी आणि पदकं भारताकडे सोपवावीत असा इशारा दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button