गॅस कनेक्शन बदलणं झालं सोपं! ‘सिम पोर्ट’सारखी LPG पोर्टेबिलिटी सेवा सुरु

घरगुती वापरातील गॅस सिलेंडर वापरत असताना त्यात अशा काही अडचणी येतात की बऱ्याचदा ही सेवा बदलण्याचा विचार येतो. कारणं अनेक असतात. वितरक किंवा एजन्सीचं असहकार्य, सेवेत दिरंगाई किंवा मनमानी ही त्यापैकीची काही कारणं. या संपूर्ण मनस्तापातून दूर राहण्यासाठी आता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळानं (PNGRB) कडून एक मोठा बदल केला जाणार आहे.
गॅस सुविधेच्या या बदलाअंतर्गत सध्याच्या घडीला वापरात असणाऱ्या कंपनीऐवजी कोणा दुसऱ्या कंपनीची सेवा घेण्याचा पर्याय ग्राहकांना निवडता येणार आहे. यासाठी मोबाईल क्पमांकावर पोर्टेबलिची (MNP) सारखीच काहीशी प्रक्रिया असेल. आतापर्यंत एलपीजी पोर्टेबलिटी फक्त एकाच कंपनीच्या विविध वितरकांच्या माध्यमातून शक्य होती. म्हणजेच तुम्ही अमूक एका कंपनीचे ग्राहक असाल तर, त्या कंपनीच्या कोणत्याही वितरकाकडून सिलेंडर घेऊ शकत होतात. मात्र कोणा नव्या कंपनीचा सिलेंडर हवा झाल्यास नवी गॅस जोडणी घेणं अपेक्षित होतं.
नवी योजना अधिक सोपी…
PNGRB च्या नव्या योजनेच्या माध्यमातून ही समस्या आता दूर होणार आहे. म्हणजेच ग्राहकांना जुन्याच गॅस जोडणीवर कोणतीही नवी नोंदणी न करता इतर LPG कंपनीची सेवा घेता येणार आहे. यामुळं ग्राहकांना अधिक पर्याय मिळणार असून, कंपन्या ग्राहकांना सेवा देण्यास बांधिल असतील. या संपूर्ण प्रक्रियेमुळं गॅस वितरकांचा मनमानी कारभार आणि गॅस डिलीव्हरीमध्ये होणारी दिरंगाई अशा समस्या दूर होण्यास मदत होईल.
ग्राहकांना काय फायदा?
कोणत्याही गॅस कंपनीची सेवा नापसंत असल्यास क्षणात ग्राहक ती बदलू शकतात.
अगदी महत्त्वाच्या प्रसंगी किंवा सिलेंडरचा साठा नसल्यास जवळच्या कोणत्याही एजन्सीतून ग्राहकांना सिलेंडर रिफिल करता येईल.
एलपीजी सिलेंडरचा दर जवळपास सारखा असतो. यासाठी ग्राहकांना फक्त वितरकांच्या सेवेच्याच आधारे कंपनी निवडण्याची मुभा असेल.
LPG पोर्टेबिलिटी योजना म्हणजे काय?
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB) ने प्रस्तावित केलेली ही योजना ग्राहकांना एलपीजी गॅस प्रदात्यांमध्ये (जसे इंडेन, भारत गॅस, एचपी गॅस) बदलण्याची सुविधा देते. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) सारखीच, ही योजना जुन्या जोडणीसह दुसऱ्या कंपनीची सेवा घेण्यास अनुमती देते, नवीन जोडणी घेण्याची गरज नसते.
सध्या LPG पोर्टेबिलिटी कशी कार्यरत आहे?
आतापर्यंत पोर्टेबिलिटी फक्त एकाच कंपनीच्या विविध वितरकांमध्ये शक्य आहे. म्हणजे, तुम्ही इंडेनचे ग्राहक असाल तर इंडेनच्या कोणत्याही वितरकाकडून सिलेंडर घेऊ शकता. मात्र, दुसऱ्या कंपनीत (उदा. भारत गॅस) जाण्यासाठी नवीन जोडणी आणि नोंदणी आवश्यक असते.
नव्या योजनेत कोणते बदल होणार आहेत?
PNGRB च्या नव्या योजनेनुसार, ग्राहक जुन्या गॅस जोडणीसह कोणत्याही LPG कंपनीची सेवा निवडू शकतील. यासाठी मोबाईल नंबरवर आधारित साधी प्रक्रिया असेल. वितरकांचा मनमानी कारभार आणि डिलिव्हरी दिरंगाई यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होईल.



