महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये 5500 असिस्टंट प्रोफेसर्सची मेगाभरती; पात्रता, प्रक्रिया जाणून घ्या!

महाराष्ट्रातील विविध विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे कधी भरली जाणार? याची अनेक वर्षांपासून प्रतिक्षा आहे. दरम्यान महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात मोठी अपडेट दिलीय. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या 28 व्या दीक्षांत समारंभात बोलत असताना त्यांनी विद्यापीठातील भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली.
राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये मार्च 2026 पर्यंत 5500 सहाय्यक प्राध्यापक आणि 2900 शिक्षकेतर पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी वित्त आणि नियोजन विभागाने मान्यता दिली असून, लवकरच सरकारी ठराव जारी होईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
नव्या राज्यपालांकडे जाणार प्रस्ताव
यापूर्वी 700 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी मान्यता मिळाली होती, परंतु माजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी सुचवलेल्या नवीन पद्धतीमुळे ती प्रक्रिया थांबली. आता नवीन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे ही प्रक्रिया पुढे जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
65 देशांतील 4000 विद्यार्थ्यांचा प्रवेश
पाटील यांनी विद्यापीठांना परदेशी विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बनवण्याचे आवाहन केले. यंदा एका एजन्सीमार्फत 65 देशांतील 4000 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात प्रवेश घेतला, विशेषतः पुणे आणि मुंबईला पसंती मिळाली. यामुळे राज्यातील शिक्षणक्षेत्राची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख वाढत आहे.
उच्च शिक्षणाला मिळणार गती
तरुणांमध्ये सामाजिक परिवर्तन घडवण्याची प्रचंड क्षमता आहे. स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया यासारख्या उपक्रमांनी तरुणांसाठी संधी उपलब्ध झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती ही राज्य सरकारची शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढवण्याची महत्त्वाची पायरी आहे. ही प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन उच्च शिक्षणाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
१. महाराष्ट्रात सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षकेतर पदांची भरती कधी पूर्ण होणार आहे?
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मार्च २०२६ पर्यंत राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये ५,५०० सहाय्यक प्राध्यापक आणि २,९०० शिक्षकेतर पदांची भरती पूर्ण होईल. यासाठी लवकरच सरकारी ठराव (जीआर) जारी केला जाईल.
२. परदेशी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी काय प्रयत्न केले जात आहेत?
यावर्षी एका एजन्सीच्या माध्यमातून ६५ देशांतील ४,००० परदेशी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात प्रवेश घेतला आहे, विशेषतः पुणे आणि मुंबईला पसंती मिळाली. विद्यापीठांना परदेशी विद्यार्थ्यांसाठी अधिक आकर्षक बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
३. सहाय्यक प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत कोणत्या अडचणी आल्या?
यापूर्वी ७०० सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी मान्यता मिळाली होती, परंतु माजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी सुचवलेल्या नवीन पद्धतीमुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आता नवीन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे ही प्रक्रिया पुढे जाईल.



