नाशिकच्या खेळाडूने टोकियोत केला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, मैदानावरचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल

भारताच्या सर्वेश कुशारेने जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत इतिहास घडवला. महाराष्ट्राच्या या 30 वर्षीय उंच उडीपटूने पुरुषांच्या अंतिम फेरीत 2.28 मीटरची झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शन नोंदवलं आणि सहाव्या क्रमांकावर आपली मजल मारली. यापूर्वी आठवड्याच्या सुरुवातीला सरवेशने या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय ठरून मोठं यश मिळवलं होतं. नाशिक जिल्ह्यातील देऊगाव या गावात कांद्याच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या खेळाडूने टोकियोच्या नॅशनल स्टेडियममध्ये आपली झेप दाखवत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
सर्वोत्तम विक्रम 2.27 मीटर
त्याचा आधीचा सर्वोत्तम विक्रम 2.27 मीटर होता, जो त्याने अवघ्या 0.01 मीटरने मोडीत काढला. मात्र 2.31 मीटर पार करण्याच्या तिन्ही प्रयत्नांत त्याला अपयश आले आणि राष्ट्रीय विक्रमाच्या जवळ जाऊनही तो थोडक्यात चुकला. तरीसुद्धा 2.28 मीटर पार करताच तो आनंदाने उफाळून आला आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय!” अशी गर्जना करत मैदानावर उत्साहाने धावू लागला.
महाराजांची घोषणा
पुरुषांच्या उंच उडी प्रकारात त्याने 2.28 मीटरची जबरदस्त झेप घेत भारताला जागतिक स्तरावर नवा मान मिळवून दिला. ही उडी सर्वेशच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरली. त्याच्या या प्रयत्नामुळे तो स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहाव्या क्रमांकावर राहिला. झेप घेतल्यानंतर क्षणभर संपूर्ण स्टेडियम उत्साहात दुमदुमलं. प्रेक्षकांकडे पाहत सर्वेशने छाती ठोकून घोषणा केली “छत्रपती शिवाजी महाराज की जय!” या गर्जनेने केवळ मैदानच नाही तर प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची लहर निर्माण केली. गावात साध्या परिस्थितीत खेळाला सुरुवात करून जागतिक पातळीवर सहावं स्थान पटकावणं ही सर्वेशसाठी आणि महाराष्ट्रासाठीही मोठी गोष्ट ठरली आहे.
दोन वर्षांच्या कष्टाची कहाणी
सर्वेशच्या या उडीमागे दोन वर्षांची कष्टाची कहाणी दडलेली आहे. “एक सेंटीमीटर वाढवायला मला जवळपास दोन वर्षे लागली. पण मी संयम ठेवला आणि आत्मविश्वास सोडला नाही. आज त्याचं फळ मिळालं,” असं तो स्पर्धेनंतर म्हणाला. त्याची सुरुवात साध्या पद्धतीने झाली होती. गावातल्या शाळेत शिक्षक व पहिले मार्गदर्शक रावसाहेब जाधव यांनी मक्याच्या काड्या, कापूस आणि जुन्या कपड्यांनी भरलेल्या गाद्यांवर सराव घडवला. सुरुवातीला तो ‘सिझर्स’ तंत्राने उडी मारायचा; पण नंतर ‘फॉसबरी फ्लॉप’मध्ये प्राविण्य मिळवून त्याने जागतिक स्तरावर मजल मारली.
भारतीय लष्करात भरती
2016 मध्ये भारतीय लष्करात भरती झाल्यानंतर त्याच्या कारकिर्दीला खरी दिशा मिळाली. आर्थिक स्थैर्य आणि योग्य सुविधा मिळाल्यामुळे तो मोठ्या पातळीवर झेपावू शकला. आपल्या पगारातून त्याने पहिल्यांदा प्रोफेशनल स्पाइक्स विकत घेतले आणि तीच त्याच्या करिअरची महत्त्वाची पायरी ठरली. यानंतर 2019 मध्ये काठमांडू येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून त्याने आपला ठसा उमटवला. 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मात्र दुखापतीमुळे 25वा क्रमांक मिळाला होता. पण या वेळेस जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर येऊन त्याने भारतासाठी ऐतिहासिक यशाची नवी पायरी गाठली.
१. सर्वेश कुशारेने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत काय यश मिळवलं?
:सर्वेश कुशारेने पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत 2.28 मीटर उडी मारून सहाव्या क्रमांकावर मजल मारली.
२. सर्वेश ही उडी त्याचा सर्वोत्तम विक्रम होता का?
: 2.28 मीटर हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम विक्रम आहे. याआधी त्याचा सर्वोत्तम विक्रम 2.27 मीटर होता
३. तो राष्ट्रीय विक्रम मोडू शकला का?
: त्याने 2.31 मीटरचा प्रयत्न केला पण तिन्ही वेळा अयशस्वी ठरला. त्यामुळे राष्ट्रीय विक्रम त्याच्याकडून चुकला.



