Latest NewsMaharashtra

मनसेला मोठा धक्का: प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम, राज ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी पक्षाला अखेरचा रामराम ठोकला असून, पक्षातील उपेक्षेचा आणि राज ठाकरेंच्या नेतृत्वातील असंतोषाचा गंभीर सूर व्यक्त केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोबत संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय भूकंप घडल्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे.

“पांडुरंग माझ्याकडे पाहत नाही” – राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंचा ‘पांडुरंग’ असा उल्लेख करत आपली नाराजी व्यक्त केली. “माझ्या नजरेत देव आहे. माझ्यावर देवाची नजरच नसेल तर मी काय करणार? माझा पांडुरंग माझ्याकडे पाहत नसेल, बघत नसेल तर मी काय करायचं?” अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांच्यावर गंभीर टीका केली.

उपेक्षा आणि दुखः यामुळे घेतला निर्णय

‘झी २४ तास’शी बोलताना महाजन यांनी स्पष्ट केलं की, “लोकसभा आणि विधानसभेच्या काळात माझी उपेक्षा झाली. मला कुठलंही तिकीट हवं नव्हतं, ना कुठलं पद. तरी मला फक्त प्रचारासाठी वापरून घेतलं. मागायचं वय राहिलेलं नाही आणि सतत मागून काही मिळत नसेल, तर तिथे थांबण्यात अर्थ नाही.”

“फक्त अमित ठाकरेंचा अपराधी आहे”

महाजन यांनी स्पष्ट केलं की, “मी पक्षात राहण्याचा शब्द फक्त अमित ठाकरेंना दिला होता. पण तो मी पाळू शकलो नाही. त्याबद्दल अपराधी आहे. राज ठाकरेंनी मात्र सतत दुर्लक्ष केलं.”

भाजपामध्ये जाण्याचे संकेत?

महाजन कुटुंब भाजपाच्या जवळचं असल्याने, ते पुढे भाजपमध्ये जाणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर हसत उत्तर देताना महाजन म्हणाले, “भाजप कुटुंबाच्या जवळचा आहे, पण मी त्या कुटुंबाच्या जवळ आहे की नाही, हेच मला कळेनासं झालं आहे.”

राजकीय भविष्य स्पष्ट नाही

“मी सक्रीय राजकारणात असलो किंवा नसलो, काही फरक पडत नाही. माणूस जगतो तोपर्यंत कार्यरत असतो,” असं म्हणत महाजन यांनी आपल्या राजकीय भविष्यात काय घडणार याबाबत स्पष्टता दिलेली नाही.

🔹 प्रकाश महाजन यांनी मनसे का सोडली?
–सततची उपेक्षा, पक्षांतर्गत संवादाचा अभाव, आणि योग्य संधी न मिळाल्यामुळे.

🔹 राज ठाकरेंवर कोणते आरोप?
– नेतृत्वाकडून दुर्लक्ष, संवादाचा अभाव आणि कार्यकर्त्यांच्या योगदानाचे अवमूल्यन.

🔹 अमित ठाकरेंबाबत काय म्हटलं?
– अमित ठाकरेंना दिलेला पक्षात राहण्याचा शब्द पाळता आला नाही, याबाबत दिलगीर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

🔹 पुढचा राजकीय प्रवास?
– महाजनांनी कोणताही पुढील पक्ष जाहीर केलेला नाही, पण भाजपशी असलेल्या संबंधामुळे चर्चा रंगली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button