सिन्नर तालुक्यात बिबट्याचा कहर; ११ वर्षीय मुलाचा मृत्यू, सहा वर्षीय चिमुकला गंभीर जखमी

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका बिबट्यांच्या दहशतीने पुन्हा हादरला आहे. अवघ्या साडेसात तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला. पंचाळे गावात ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर खडांगळी शिवारात सहा वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे.
रविवारी संध्याकाळी पंचाळे गावात सारंग थोरात हा ११ वर्षीय मुलगा आपल्या मित्रांसोबत अंगणात लपाछपी खेळत होता. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. हा प्रसंग इतका वेगवान होता की सारंगचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली.
दरम्यान, याच दिवशी अवघ्या काही तासांत खडांगळी शिवारात सहा वर्षांच्या मुलावरही बिबट्याने झडप घातली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्यांची वर्दळ वाढली आहे. रात्रीच्या वेळी नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत, तर शेतकरीही काम करताना धास्तावले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या सलग घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.



