नवनीत राणा राज ठाकरेंविषयी बोलताच फिरवली पाठ, सिद्धार्थ जाधवच्या कृतीचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक!

अमरावती : सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यात नेटकरी मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवचं कौतुक करतायत. सिद्धार्थने आपल्या कृतीने आमचं मन जिंकलंय असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. अमरावती येथील दहीहंडी कार्यक्रमादरम्यान खासदार नवनीत राणा यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवातला हा व्हिडीओ आहे. असं नेमकं काय आहे या व्हिडीओत? सविस्तर जाणून घेऊया.
सिद्धार्थ जाधवचं होतंय कौतुक
महाराष्ट्रात सध्या मराठी-अमराठी वाद पाहायला मिळतोय. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक भूमिका घेताना दिसतायत. यावरुन विरोधक त्यांच्यावर निशाणादेखील साधतायत. याच पार्श्वभूमीवर दहीहंडीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यात नवनीत राणांनी राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधवने पाठ फिरवल्याचे व्हिडीओत दिसतंय. सिद्धार्थच्या या कृतीचे नेटकऱ्यांकडून कौतुक होतंय.
‘भाषेचा वाद पेटवून आपली राजकीय पोळी भाजतायत’
17 ऑगस्ट 2025 रोजी नवाते चौकात युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भव्य दहीहंडी स्पर्धेत संपूर्ण विदर्भातून गोविंदा पथके सहभागी झाली होती. आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी या उत्सवाचे आयोजन केले होते, ज्यामुळे अमरावतीत उत्साहाचे वातावरण होते. यावेळी मंचावर अभिनेता सिद्धार्थ जाधव उपस्थित होता. नवनीत राणा यांनी मंचावरुन भाषण करताना आपल्या भाषणात मराठीच्या मुद्द्यावरुन नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली. काही राजकीय नेते फक्त भाषेचा वाद पेटवून आपली राजकीय पोळी भाजत आहेत. असे नवनीत राणा यांनी म्हटले.
सिद्धार्थ जाधवने फिरवली मंचाकडे पाठ
नवनीत राणा हे विधान करत असताना अभिनेता सिद्धार्थ जाधव मंचाकडे पाठ करुन मागच्या बाजुला जाताना दिसला. यामुळे उपस्थितांमध्ये चर्चांना उधाण आले. सिद्धार्थ जाधव हा कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. आपण नाराज होऊन पाठ फिरवली? की दुसऱ्या कोणत्या कारणासाठी मागे गेलो यावर सिद्धार्थ जाधवकडून कोणते स्पष्टीकरण आले नाही. असे असले तरी सिद्धार्थ जाधवने अनेकदा राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन दिले आहेत. त्यामुळे तो नाराज होऊन मागे फिरला असावा असं नेटकरी म्हणतायत आणि त्याचं कौतुक करतायत.



