आमच्या कुटुंबाला संघर्ष पाचवीला पूजलेला; मुख्यमंत्र्यांसमोर धनंजय मुंडेंची फटकेबाजी, केली ‘ही’ मागणी..
मुंडेसाहेबांना संघर्ष पाचवीला पूजलेला, तसाच आमच्या कुटुंबाच्या वाटेलाही संघर्ष पूजलेला आहे, पण मी सावलीसारखं, अगदी पहिल्या संघर्ष यात्रेपासूनचा हा संघर्ष पाहिलेला आहे.
लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूर येथे स्व.गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास मुंडे बंधु-भगिनींसह राज्याचे 2 मंत्री आणि अनेक आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. येथील कार्यक्रमात मुंडे बंधु-भगिनींनी तुफान फटकेबाजी केली. माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणातून धनंजय मुंडेंचा संघर्ष सांगितला, तसेच आमच्या परळी मतदारसंघाकडे लक्ष द्यावे, अशी विनंती देखील मुख्यमंत्र्यांना केली. मुंडे साहेबांना संघर्ष पाचवीला पुजलेला, तसा आमच्या कुटुंबालाच संघर्ष पाचवीला पूजलेला असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं.
मुंडेसाहेबांना संघर्ष पाचवीला पूजलेला, तसाच आमच्या कुटुंबाच्या वाटेलाही संघर्ष पूजलेला आहे, पण मी सावलीसारखं, अगदी पहिल्या संघर्ष यात्रेपासूनचा हा संघर्ष पाहिलेला आहे, असे म्हणत आमदार धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. गोपीनाथ मुंडेंनी फक्त आणि फक्त सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठीच त्यांनी तो संघर्ष केला. ज्यावेळी 2011 साली भाजपमध्ये भाजप अध्यक्ष व्हायचा होता, त्यावेळी मुंडे साहेबांनी पहिलं नावं घेतलं ते देवेंद्र फडणवीस यांचं घेतलं. उभा महाराष्ट्र त्यांनी संघटना बांधणीसाठी काम केलं. कर्तृत्ववान कार्यकर्ता हा मुख्यमंत्री होऊ शकतो हे देवेंद्र फडणवीस यांनी सिद्ध केलं, असे म्हणत मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षावही केली.
मुंडेसाहेब मुख्यमंत्री व्हावं अशी आपली सर्वांची इच्छा होती, पण दुर्दैवाने ते आपल्यातून लवकर गेले. मात्र, त्यांचा आशीर्वाद असलेले देवेंद्र फडणवीस हे एकवेळा नाही तीनदा मुख्यमंत्री झाले. परळी मतदार संघ बाजूलाच आहेत, तिकडं देखील आपण लक्ष द्यावं. तुम्ही आहात, बाजूला पंकजा ताई, जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले आहेत तुमचे मन राजासारखे आहे. तुमच्या शिवाय वाड्या-वत्याचा विकास होऊ शकणार नाही, असे म्हणत परळी मतदारसंघाकडे लक्ष देण्याची मागणी धनंजय मुंडेंनी मंचावरील सर्वच मंत्र्यांना केला. तसेच, तुम्हा-आम्हा सर्वांना गोपीनाथ मुंडेंचा वारसा आहे, असेही मुंडेंनी म्हटले.
जयकुमार गोरेंचा कुणाला टोला
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे कामं करतायत, अनेकजण स्वतःला जाणते राजे म्हणवतात. पण खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करणारा हा मुख्यमंत्री आहे, देवेंद्र फडणवीस. लोकांच्या विकासाचा गाडा पुढे नेणारा मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस साहेब, अशा नेत्याच्या हस्ते आज मुंडे साहेबांच्या पुतळ्याचे लोकार्पण होतंय, असे म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. तर, शिवेंद्रराजे भोसले यांनीही फडणवीसांच्या कार्याचं केलं.
शिवेंद्रसिंह राजे भोसले भाषण
मुंडे साहेबांच्या पुतळ्याचे अनावरण हा सर्वांसाठी भावनिक क्षण आहे. मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनखाली तयार झालेले देवेंद्र फडणवीस, दुसऱ्या बाजूला पंकजाताई आणि धनुभाऊ यांच्या उपस्थितीत हा सोहळा म्हणजे भावनिक क्षण आहे. मी पाहिल्यांदा आमदार झालो तेव्हा मुंडे साहेब सभागृहात यायचे तेव्हा आम्हाला सर्वांना आतुरता असायची. साहेब सभागृहात आलेत ते काय बोलतात हे पाहावं वाटायचं. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली फडणवीस साहेबांसारखे नेतृत्व झाले, मुंडे साहेब मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. पण, त्यांचे शिष्य फडणवीस साहेबांनी हे स्वप्न पूर्ण केलं. राज्यात मुंडे साहेबांना अपेक्षित असलेले काम आज महायुती म्हणून करतोय. केंद्रात देखील मोदी साहेब देशाला पुढे न्यायचं काम करतायत, असे मंत्री भोसले यांनी म्हटलं.



