‘लब्बाड पटेल’ म्हणत नाना पाटेकरांनी उडवली जब्बार पटेलांची खिल्ली, भाषण चर्चेत

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकत्याच एका चित्रपटाच्या प्रीमियर कार्यक्रमात आपल्या खास शैलीत अनेक आठवणींना उजाळा देत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या भाषणात दिग्गज अभिनेते अरुण सरनाईक, शरद राव, तसेच दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचा विशेष उल्लेख होता. या वेळी नानांचा बोलण्याचा सहज आणि सडेतोड अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
नानांनी जुन्या आठवणींत रंगताना अरुण सरनाईकांचा उल्लेख करत एक भावनिक संवाद केला. ज्यामध्ये ते म्हणाले की, एक पाखरू आमच्यावर रुसलंय जणू. हा प्रसिद्ध डायलॉग आठवत नानांनी सरनाईकांच्या अभिनयातील सहजतेचं कौतुक केलं. ते म्हणाले, सरनाईक सहजगतीने अभिनय करायचे, पण हल्ली काही कलाकार सहजतेचं एवढं अॅक्टिंग करतात की ते भूमिकेत शिरतच नाहीत.
शेतकऱ्यांबद्दल वाटणारी वेगळी वेदना
या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या शरद राव यांचाही नानांनी आदरपूर्वक उल्लेख केला. प्रकृती ठीक नसतानाही ते या प्रीमिअरला आले, याबद्दल त्यांचे विशेष आभार. ‘नटसम्राट’ साकारताना डोळ्यांत येणारे अश्रू वेगळे असतात. पण शेतकऱ्यांना बघताना डोळ्यांत पाणी येत नाही कारण सगळंच आतून सुकून गेलंय. नाना पाटेकरांच्या या वाक्यांनी अनेकांची मने हेलावली.
मी जब्बार पटेलांना लब्बाड पटेल म्हणतो
नाना पाटेकर यांनी डॉ.जब्बार पटेल यांचं नाव घेऊन मिश्कीलपणे त्यांची खिल्लीही उडवली. ते म्हणाले की, मी त्याला लब्बाड पटेल म्हणतो. त्याने मला ‘सिंहासन’ या एकाच चित्रपटात घेतलं आणि मानधनातले दोन हजार रुपये दिलेच नाहीत. नानांच्या या विधानानंतर कार्यक्रमाच एकच हशा पिकला. त्यानंतर ते म्हणाले त्याने मग पुन्हा कधीच मला त्यांच्या कोणत्याही चित्रपटात घेतलं नाही. कदाचित माझा अनुभव त्याच्यासाठी पुरेसा झाला असावा असं नाना पाटेकर म्हणाले.
नाना पाटेकर यांच्या थेट आणि मिश्कील आणि मार्मिक भाषणाने संपूर्ण प्रीमियर कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या बोलण्यातून एकीकडे जुन्या सहकलाकारांविषयीचा आदर व्यक्त झाला तर दुसरीकडे हलक्या फटक्यांतून आजच्या चित्रपटसृष्टीतील वास्तवावर भाष्यही झालं.



