सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव: कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्याकडून सन्मान
अमरावती – कर्मचारी सेवानिवृत्त होत असतांना त्यांच्या कार्याचा सत्कार करणे हे माझे महत्वाचे कार्य मी समजतो. विद्यापीठाचा आज जो देशभरात नावलौकीक आहे, तो कर्मचा-यांमुळेच. आव्हानात्मक परिस्थितीतही विद्यापीठातील कर्मचारी आपल्या कुटुंबासारखे येथे राबतात. यापुढेही असेच कार्य करीत राहावे, जेणेकरुन विद्यापीठाचा नावलौकीक आणखी वाढेल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सांख्यिकीशास्त्र विभागप्रमुख तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश सिंह, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, नियंत्रण अधिकारी उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे, सहा. कुलसचिव अनिल काळबांडे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, सत्कारमूर्ती श्री गजानन पंचवटे, सौ. पंचवटे, श्री प्रकाश शिंदे, सौ. शिंदे, श्री अशोक राऊत, सौ. राऊत, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते.
कुलगुरू पुढे म्हणाले, सत्कारमूर्तींच्या प्रेमापोटी आज सभागृह तुडूंब भरले आहे. श्रृतलेखनाचे विविध सभांचे इतिवृत्त अचुकपणे तयार करण्याचे अतिशय महत्वाचं काम श्री गजानन पंचवटे यांनी पार पाडले आहे. परीक्षा विभागाचे कठीण कार्य कर्मचारी सुरळीतपणे पार पाडत आहेत, ही मोठी उपलब्धी आहे, असे सांगून त्यांनी सत्कारमूर्तींना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी श्री गजानन पंचवटे, श्री प्रकाश शिंदे व श्री अशोक राऊत यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरव प्रमाणपत्र देऊन, तर सौ. पंचवटे यांचा सहा. कुलसचिव सौ. साक्षी ठाकुर, सौ. शिंदे व सौ. राऊत यांचा उपकुलसचिव सौ. मोनाली तोटे पाटील यांनी साडी-चोळी व कुंकवाचा करंडा देवून सत्कार केला.
प्रमुख अतिथी डॉ. राजेश सिंह म्हणाले, विद्यापीठाचे कर्मचारी कुटुंबाप्रमाणे आणि निष्ठेने कामे करतात. एका लहानशा रोपट¬ाचे वटवृक्षामध्ये रुपांतर करण्यात कर्मचा-यांचा मोठा वाटा आहे. संस्था चालवायला ज्या बाबी लागतात, त्या विद्यापीठाच्या कर्मचा-यांमध्ये आहेत, असे सांगून त्यांनी सत्कारमूर्तींना उज्ज्वल भविष्याच्या शुभकामना दिल्या. यावेळी सत्कारमूर्ती श्री गजानन पंचवटे, श्री प्रकाश शिंदे व श्री अशोक राऊत यांनी आपल्या सेवा काळातील अनुभव सांगतांना सहकारी कर्मचा-यांकडून मिळालेले प्रेम, स्नेहभाव व सहकार्यामुळेच आम्हाला चांगली सेवा विद्यापीठाला देता आली. त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तर नियंत्रण अधिकारी श्री मंगेश वरखेडे, श्री अनिल काळबांडे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख यांनीही मनोगतातून सत्कारमूर्तींना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्यात.
विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने अध्यक्ष श्री मंगेश वरखेडे, उपाध्यक्ष डॉ. अविनाश असनारे, कोषाध्यक्ष श्री राजेश एडले व मानद सचिव श्री श्रीकांत तायडे यांनी सत्कारमूर्ती श्री गजानन पंचवटे, श्री प्रकाश शिंदे व श्री अशोक राऊत यांचा भागभांडवलाचा धनादेश देऊन सत्कार केला. राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, संचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी, तर आभार अधीक्षक श्री धनंजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला माजी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी तसेच विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणीचे सदस्य, विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच सत्कारमूर्तींच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.



