अमरावती शहरात हॉकर्स झोन तयार करण्यासाठी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
अमरावती : शहरात अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण मिळवून त्यांना अधिकृत व नियोजनबद्ध स्वरूपात व्यवसायाची सुविधा मिळावी यासाठी आज महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
या बैठकीत शहरातील पाचही झोनमधील हॉकर्स झोनसाठी संभाव्य जागांची ओळख पटविण्यात आली. सर्व झोनचे अधिकारी, नगररचना व संबंधित विभागांनी यासंदर्भात सादरीकरण (प्रेझेंटेशन) करून संभाव्य जागा निश्चित केल्या. या ठिकाणी फेरीवाल्यांना अधिकृत स्वरूपात व्यवसाय करता यावा यासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निर्देश दिले की, हॉकर्स झोनसाठी निश्चित जागा प्रस्तावित करणे. शहरातील पाचही झोनमध्ये हॉकर्स झोनसाठी योग्य व सुसज्ज जागा तातडीने ओळखून त्यांचे प्रस्ताव सादर करावेत. प्रत्येक झोनने प्रेझेंटेशन सादर करावे.
संभाव्य जागा, सुविधा व अंमलबजावणी प्रक्रियेबाबत प्रत्येक झोनने स्वतंत्र प्रेझेंटेशन तयार करून सादर करावे. अनधिकृत हॉकर्सवर लक्ष ठेवणे. शहरात जेथे अनधिकृत फेरीवाले व्यवसाय करत आहेत, त्या सर्व ठिकाणांची यादी तयार करावी आणि त्यांना तातडीने नोटीस देण्यात यावी. नोटीस दिल्यानंतरही जर संबंधित हॉकर्सने जागा रिकामी केली नाही, तर त्या ठिकाणी त्वरित हटविण्याची कार्यवाही करण्यात यावी. हॉकर्स झोनमध्ये मूलभूत सुविधा देणे. हॉकर्स झोनमध्ये पाणी, वीज, स्वच्छता व सुरक्षितता यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून फेरीवाल्यांना सन्मानपूर्वक व्यवसाय करता येईल. वाहतूक व पादचारी मार्ग मोकळा ठेवणे. हॉकर्स झोन निश्चित करताना रस्त्यावरील वाहतूक व पादचारी मार्ग यांना अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात यावी. संपूर्ण प्रक्रिया नियोजनबद्ध व टप्प्याटप्प्याने पार पाडावी, आणि प्रत्येक टप्प्यावर नियंत्रण व अहवाल सादर करण्यात यावा.
बैठकीदरम्यान आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले की, शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात येईल. ज्या ठिकाणी अनधिकृत हॉकर्स आढळून येतील, त्यांना प्रथम नोटीस देण्यात यावी. मात्र, नोटीस देऊनही जर संबंधितांनी अनधिकृत व्यवसाय सुरू ठेवला, तर त्या ठिकाणी महानगरपालिकेच्यावतीने तात्काळ कारवाई करून संबंधित फेरीवाल्यांना हटविण्यात यावे.
शहर स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकांना सुलभ असा ठेवण्याच्या दृष्टीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. नियोजित हॉकर्स झोनमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अतिक्रमण व अस्वच्छतेवर नियंत्रण मिळवता येईल, असे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी हॉकर्स धारकांना आवाहन केले की, अमरावती शहरात वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आणि रस्त्यांवरील वाहतूक व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हॉकर्स झोन तयार करणे ही अत्यंत गरजेची बाब आहे. या उपक्रमात सर्व नागरिक, फेरीवाले, व्यापारी आणि प्रशासन यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहरातील सर्व फेरीवाल्यांना आवाहन केले की, त्यांनी आपला व्यवसाय अधिकृत आणि नियोजित हॉकर्स झोनमध्येच करावा. अनधिकृत ठिकाणी व्यवसाय करणे टाळावे, कारण अशा प्रकरणांवर महापालिकेकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनीही सहकार्य करावे आणि कोणत्याही अनधिकृत फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करताना काळजी घ्यावी. आपण सर्वजण मिळून स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध अमरावती शहर घडवूया.
महापालिकेच्या या उपक्रमात सहकार्य करून, एक स्वच्छ, अतिक्रमणमुक्त व सुरक्षित अमरावती घडविण्यास आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले आहे.
या बैठकीत अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, नितीन बोबडे, धनंजय शिंदे, बाजार परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त दिपक खडेकार, अधिक्षक उदय चव्हाण, उपअभियंता प्रमोद इंगोले, श्रीरंग तायडे, विवेक देशमुख, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, मनपा कर्मचारी उपस्थित होते.



