Latest News

PM Kisan : मेसेजची रिंगटोन वाजली की समजा पैसे आले, पीएम किसानचे 2000 रुपये ‘या’ दिवशी येणार, सरकारकडून मोठी अपडेट

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. अखेर पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये 2 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत एक्स खात्यावरुन याबाबत घोषणा करण्यात आली आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत एक्स खात्यावरुन घोषणापीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स वरुन 20 व्या हप्त्याबाब घोषणा करण्यात आली आहे. आता अधिक वेळ वाट पाहावी लागणार नाही. पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याची रक्कम 2 ऑगस्ट 2025 ला वाराणसी,उत्तर प्रदेश येथील कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाईल. मेसेज टोन वाजताच तुमच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीची रक्कम पोहोचली, असं समजा, अशी माहिती देण्यात आली आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्याकडून चालवली जाते. या योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2019 ला करण्यात आली होती. तेव्हापासून पात्र शेतकऱ्यांना 19 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. 19 व्या हप्त्याची रक्कम बिहारमध्ये कार्यक्रम आयोजित करुन जारी करण्यात आली होती. त्यापूर्वी 18 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना महाराष्ट्रात वाशिम येथे कार्यक्रम आयोजित करुन देण्यात आली होती.

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार
देशभरातील सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीची रक्कम 19 व्या हप्त्याद्वारे देण्यात आली होती. पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका आर्थिक वर्षात 6000 रुपयांची मदत केली जाते. दोन हप्त्यांमध्ये साधारणपणे चार महिन्यांचा वेळ असतो. 19 व्या हप्त्याची रक्कम 24 फेब्रुवारी 2025 ला शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली होती. आता 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ऑगस्टला पाठवली जाणार आहे. महाराष्ट्रातील 9325774 लाभार्थ्यांना 19 व्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीची प्रतीक्षा केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली होती. त्या योजनेतून देखील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. या योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अपडेटसाठी योजनेची वेबसाईट आणि एक्स वरील योजनेचं अधिकृत खातं याशिवाय सोशल मीडियातून पसरवल्या जाणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button