न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते दादासाहेब गवई प्रवेशद्वाराचे भूमिपूजन

अमरावती : भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांचे आज दारापूर येथे आगमन झाले. या दौऱ्यादरम्यान, केरळचे माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन सरन्यायाधीश गवई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हे प्रवेशद्वार आमदार सुलभा खोडके आणि आमदार संजय खोडके यांच्या आमदार निधीतून साकारण्यात येत आहे.
या प्रसंगी, दादासाहेब गवई यांच्या स्मृतिदिनानिमित्त सरन्यायाधीश भूषण गवई आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या अभिवादन सभेला अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांच्यासह अनेक अधिकारी, शिक्षकवृंद आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी बोलताना, दादासाहेब गवई यांच्या कार्याची आणि त्यांनी समाजसेवेत दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. त्यांच्या नावाने उभारले जाणारे हे प्रवेशद्वार त्यांच्या कार्याची आणि विचारांची कायम स्मृती जागृत ठेवेल, असे त्यांनी नमूद केले. आमदार सुलभा खोडके आणि आमदार संजय खोडके यांनीही दादासाहेब गवई यांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि त्यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्याचा उद्देश स्पष्ट केला.
या कार्यक्रमामुळे दारापूर परिसरात उत्साहाचे वातावरण होते.



