चांदूरबाजार तालुक्यात शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन; खुल्या आम चौकात रमी पत्ते वाटून सरकारचा निषेध

चांदूरबाजार : चांदूरबाजार तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी, विशेषतः संपूर्ण कर्जमाफीसाठी, जोरदार चक्काजाम आंदोलन केले. या अनोख्या आंदोलनादरम्यान, शेतकऱ्यांनी खुल्या आम चौकात रमी पत्ते खेळून सरकारचा निषेध केला. सततची नापिकी, वाढती कर्जबाजारीपणा आणि शासकीय दुर्लक्ष यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत जतस्त चौक, शिरजगाव बंड चौक, आणि पंचायत समिती कार्यालयासमोर चक्काजाम व रमी पत्ते खेळून ठिय्या आंदोलन छेडले.
शेतकऱ्यांचा तीव्र आक्रोश
आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याने माध्यमांशी बोलताना आपला आक्रोश व्यक्त केला. तो म्हणाला, “सरकार फक्त घोषणा करते, पण प्रत्यक्षात मदत मिळत नाही. कर्जबाजारीपणामुळे आमच्या घरात उपासमारीची वेळ आली आहे.” अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांपासून पावसाची अनियमितता आणि बाजारभावातील घसरण यामुळे ते गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत.
आंदोलकांच्या मुख्य मागण्या
या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी सरकारसमोर अनेक प्रमुख मागण्या ठेवल्या:
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज तात्काळ माफ करावे.
नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी.
शेतमालाला हमीभावाची हमी लागू करावी.
प्रशासनाची भूमिका
शेतकऱ्यांच्या या तीव्र आंदोलनामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तहसीलदार व पोलीस प्रशासनाने आंदोलकांचे निवेदन स्वीकारले असून, ते शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.
आंदोलनाची पुढील दिशा
शेतकरी संघटनांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. तसेच, जिल्हा बंदची हाक देण्याचाही विचार होऊ शकतो, असा मोठा इशारा प्रहार संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी दिला आहे.
प्रतिनिधी: सुयोग गोरले



