मिशन “फुटपाथ फ्रीडम” अंतर्गत अतिक्रमणावर कारवाई

अमरावती : माननीय आयुक्त यांचे “मिशन फुटपाथ फ्रीडम” या विशेष अभियानाअंतर्गत आज दिनांक १५/०७/२०२५ रोजी सकाळी ११:३० वाजल्यापासून झोन क्रमांक ३ मधील दस्तुरनगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.
राजेंद्र कॉलनी ते मोती नगर या मार्गावर करण्यात आलेल्या कारवाईत रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या, फळ विक्रेते, लोखंडी पानठेले तसेच हॉटेलच्या बाहेर वाढवून ठेवलेले शेड यावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाद्वारे कठोर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत बरेच साहित्य जप्त करण्यात आले असून काही अतिक्रमणांची थेट तोडफोड करण्यात आली. या कारवाईत सुमारे २ ट्रक भरभरून साहित्य जप्त व नष्ट करण्यात आले आहे.
ही कारवाई सध्या देखील सुरू असून नागरिकांचा चालण्या-फिरण्याच्या हक्कासाठी सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणमुक्त मोहिमेला वेगाने चालना दिली जात आहे. महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक, संबंधित विभाग अधिकारी, पोलीस प्रशासन व अन्य कर्मचारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी स्वयंप्रेरणेने अतिक्रमण हटवावे अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.
सदर कार्यवाही दरम्यान अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे, पोलिस विभागाचे महिला कर्मचारी, निरीक्षक शहबान, मनपा कर्मचारी उपस्थित होते.



