AmravatiLatest News

अमरावतीत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: अपहरण करून जबरी चोरी करणाऱ्यांना १२ तासांत अटक

अमरावती : अमरावती शहरात फ्रेजरपुरा पोलिसांनी एका धक्कादायक अपहरण आणि जबरी चोरीच्या गुन्ह्याचा १२ तासांच्या आत छडा लावून आरोपींना जेरबंद केले आहे. या कामगिरीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पोलिसांनी २ लाख ७२ हजार २०० रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ जुलै २०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीला सुंदरलाल चौकातील जजिरा हॉटेलमधून बाहेर बोलावून आरोपींनी त्याला ओला कंपनीच्या ई-वाहनावर जबरदस्तीने बसवले. त्यांच्यासोबत आणखी दोन आरोपी स्पायडर दुचाकीवरून होते. या चौघांनी फिर्यादीला मोसीकॉल जिनजवळच्या खुल्या मैदानात नेले. तिथे त्याला मारहाण करून त्याचा ॲपल कंपनीचा आयफोन १६ प्रो (किंमत १,००,००० रु.) जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत त्याला प्रवीण नगर रोडवरील मणिपूर लेआउट नावाच्या निर्जन ठिकाणी नेले.

या ठिकाणी पुन्हा मारहाण करून चाकूच्या धाकावर पैशांची मागणी केली. घाबरलेल्या फिर्यादीने आपल्या बहिणीच्या फोन पे वरून ५,००० रुपये आरोपींच्या सांगण्यावरून मोडल स्टेअरच्या स्कॅनरवर ऑनलाइन मागवून घेतले, जे आरोपींनी हिसकावून घेतले. अशा प्रकारे एकूण १,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरण्यात आला. मोबाइल परत हवा असेल तर १०,००० रुपये आणखी द्यावे लागतील, अन्यथा मोबाइल फोडून टाकू आणि पोलिसात तक्रार दिल्यास जिवाने मारण्याची धमकीही आरोपींनी दिली. फिर्यादीच्या जबाबावरून फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये अप क्र. ५८०/२०२५, कलम ३०९ (६), १४० (३), ३५१ (३), ३ (५) बी.एन.एस. (भारतीय न्याय संहिता) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. आरोपींनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी खबरदारी घेतली असली तरी, पोलिसांनी आपल्या कौशल्याचा वापर करत आरोपींचा मागोवा घेतला. तपासाअंती, श्री कृष्णा उर्फ क्रिश प्रमोद सुयंवशी (वय २०, रा. लक्ष्मीनगर, अमरावती) आणि अनिश उर्फ अंशु अनिल वाघमारे (वय २०, रा. लक्ष्मीनगर, अमरावती) यांना शिताफीने अटक करण्यात आले. तसेच, एका विधी संघर्षग्रस्त बालकाला (V.S.B.) ताब्यात घेण्यात आले.

या आरोपींकडून जबरीने चोरी केलेला ॲपल आयफोन १६ प्रो (किंमत १,००,००० रु.), रोख २,००० रुपये, गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या दोन दुचाकी (किंमत १,७०,००० रु.) आणि एक चायनीज चाकू (किंमत २०० रु.) असा एकूण २,७२,२०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

पोलीस आयुक्त अरविंद चावरिया सो., पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) श्री. गणेश शिंदे सो., सहाय्यक पोलीस आयुक्त (फ्रेजरपुरा विभाग) श्री. कैलास पुंडकर सो. यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट, पोलीस निरीक्षक निलेश गावंडे, पोउपनि राहुल महाजन, पोहवा/१२८० सुभाष पाटील, पोहवा/१२५२ संदीप देशमुख, नापोका/१३५३ शशिकांत गवई, नापोका/१८३० सचिन बोरकर, पोशि/९८९ सागर चव्हाण, पोशि/३५२ जावेद पटेल, पोशि/१६१५ प्रशांत वानखडे आणि चालक पोशि/१८०३ उमेश चूलपार** यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button