AkolaLatest News

प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडकडून अकोल्यात निषेध; हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी

अकोला : महाराष्ट्राच्या घराघरात शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार पोहोचवणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा अकोल्यात संभाजी ब्रिगेडने तीव्र निषेध नोंदवला आहे. काही माथेफिरूंनी शाईफेक करून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेतील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे.

संभाजी ब्रिगेडने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संविधानाच्या चौकटीत राहून सामाजिक आणि ऐतिहासिक सत्यांचा पुनर्विचार करून विचार मांडणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. परंतु प्रवीण गायकवाड यांच्यावर काही तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांनी हल्ला करत काळे फासले, ही घटना अत्यंत निंदनीय, असंविधानिक आणि लोकशाही मूल्यांना विरोध करणारी आहे.

गायकवाड यांनी आजवर ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर विचारपूर्वक भाष्य केले आहे. समाजातील वंचित घटकातील होतकरू तरुणांना रोजगाराचे एक मोठे व्यासपीठ त्यांनी तयार करून दिले आहे. त्यांचे विचार पटोत वा न पटोत, त्यावर प्रतिवाद करणे हे लोकशाही मार्गानेच व्हायला हवे, हीच संविधानाची अपेक्षा आहे. मात्र, त्यांच्या वैचारिक भूमिकेला हिंसक विरोध करून त्यांना लक्ष्य करणे, हा सामाजिक अहिंसेच्या तत्त्वांचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अवमान आहे, असे संभाजी ब्रिगेडने निवेदनात स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने लावून धरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button