महानगरपालिकेत ‘ई-ऑफीस प्रणाली’ कार्यशाळा संपन्न

अमरावती : अमरावती महानगरपालिकेत आज ‘ई-ऑफीस प्रणाली’ विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेचा उद्देश शासकीय कामकाजात डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर करून पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविणे हा होता. महानगरपालिकेतील विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. ई-ऑफीस प्रणाली अंतर्गत फाईल ट्रॅकिंग, ई-नोटिंग, दस्तऐवज व्यवस्थापन व डिजिटल स्वाक्षरी यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रफुल मेहर, आशिष विधळे यांनी उपस्थितांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रणालीचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण दिले व यामधील तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, “ई-ऑफीस प्रणालीच्या माध्यमातून कार्यालयीन प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होणार असून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देणे शक्य होईल.” आजच्या डिजिटल युगात शासकीय आणि निमशासकीय कामकाजात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि वेळेची बचत अत्यंत आवश्यक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, ई-ऑफिस प्रणाली ही आपल्या महानगरपालिकेसाठी एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे.
ई-ऑफिस प्रणालीमुळे कागदावरील कामकाज कमी होणार असून “पेपरलेस ऑफिस” या दिशेने आपण वाटचाल करणार आहोत, फायलींच्या हालचाली अधिक वेगवान आणि ट्रॅक करण्यायोग्य बनतील, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता येईल, तसेच, नागरिकांना वेळेत सेवा देणे शक्य होईल.
आपल्या महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये ही प्रणाली अंमलात आणल्याने, सेवा वितरणात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडतील याबाबत मला खात्री आहे. या कार्यशाळेचा उद्देश म्हणजे अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना या नव्या प्रणालीची सखोल माहिती देणे आणि तिचा प्रभावी वापर सुनिश्चित करणे.
उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी सांगितले की, कोणतीही नवीन प्रणाली स्वीकारतांना सुरुवातीस थोडी अडचण होऊ शकते, पण सातत्यपूर्ण सराव आणि समर्पित प्रयत्नांनी आपण ती आत्मसात करू शकतो. आपला सहभाग आणि सहकार्य यावरच या उपक्रमाचे यश अवलंबून आहे. आपण ही प्रणाली केवळ एक बदल म्हणून नव्हे, तर आपल्या कामकाजात एक नवा मानक निर्माण करणारा टप्पा म्हणून स्वीकारा. या ई ऑफीस प्रणालीचे प्रशिक्षणाचे संचालन सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे यांनी केले. या कार्यशाळेत अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण यशस्वीकरण्याकरीता सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, सॉफ्टवेअर अभियंता रोहन कुरील, प्रकल्प अभियंता पंकज मानवटकर, हार्डवेअर अभियंता चेतन रामटेके, संगणक विभागातील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.



