चिखलीत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात काँग्रेसचे ‘जोड़े मारो आंदोलन’!

बुलढाणा : भाजपचे माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ चिखली येथे काँग्रेसने जोरदार ‘जोड़े मारो आंदोलन’ छेडले. लोकांच्या अंगावरील कपडे, चप्पल आणि त्यांचा पगार सरकार देते, असे विधान करून लोणीकर यांनी शेतकरी आणि महिला वर्गाचा अवमान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसने सरकारला जोरदार इशारा दिला आहे की, “जनतेच्या करातून आलेल्या सत्ताधाऱ्यांचे कपडे आता जनताच फाडेल!”
‘जनतेशिवाय सत्ताधारी शून्य’ – राहुल बोंद्रे यांचा संतप्त इशारा
या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले,
“सत्ताधाऱ्यांच्या अंगावरील कपडे, बूट, गाड्यांमधील डिझेल, विमानाची तिकिटं ही सगळी जनता भरलेल्या करातून मिळते. भाजप नेत्यांची बेताल वक्तव्ये जर अशीच सुरू राहिली, तर जनता खरोखरच त्यांना जोडे मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.”
भाजप नेत्याच्या विधानावर संतापाची लाट
चिखली तालुक्यातील जनतेत आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बबनराव लोणीकर यांच्या विधानामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लोणीकर यांनी “लाडक्या बहिणींना सरकार पगार देते”, “लोकांच्या अंगावरील कपडे सरकारचे आहेत” असे विधान करताच सोशल मिडीयावरही त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाला आहे.
आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती
या ‘जोड़े मारो आंदोलनात’ असंख्य काँग्रेस पदाधिकारी, युवक कार्यकर्ते, महिला आघाडीच्या सदस्या आणि स्थानिक जनता सहभागी झाली. घोषणाबाजीसह झालेल्या या आंदोलनाने संपूर्ण चिखली परिसरात राजकीय खळबळ माजवली आहे.



