पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाकरिता तालिका सभाअध्यक्ष म्हणून आ. सुलभा खोडके यांच्या नावाची घोषणा

मुंबई : राज्यविधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२५ ला आज दिनांक ३० जुनपासून मुंबई येथे सुरुवात झाली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका सभाअध्यक्ष म्हणून जेष्ठ विधानसभा सदस्य आ.सुलभा खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पावसाळी अधिवेशनाचे कामकाज चालविण्यासाठी पीठासीन सभाअध्यक्ष अँड.राहुल नार्वेकर यांच्याबरोबरच सभागृह चालविण्यासाठी तालिका अध्यक्ष म्हणून आ.सुलभा खोडके यांचे नाव घोषित झाल्याने सभागृहातील सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री ना. देवेन्द्रजी फडणवीस , उपमुख्यंमंत्री ना. एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार देखील उपस्थित होते.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात साधारणत:आठ तासांचे कामकाज चालणे अपेक्षित असते . अर्थातच आठ तास पीठासीन अध्यक्ष त्या खुर्चीवर बसून राहू शकत नाहीत. त्यामुळे अध्यक्ष अनुपस्थित असतील तेव्हा सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी तालिका अध्यक्षांचे एक पॅनल तयार करण्यात येते. या पॅनलवर महाराष्ट्र विधानसभेच्या नियम ८ पोट नियम १ अन्वये तालिका सभाध्यक्ष म्हणून आ.सुलभा खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
आ. सुलभा खोडके ह्या महाराष्ट्र विधानसभेवर तिसऱ्यांना निवडून आल्या असून एक अभ्यासू व विधानसभेच्या कामकाजही उत्तम जाण असलेल्या जेष्ठ सदस्य म्हणून सुद्धा त्यांची सभागृहात ओळख आहे. विधानसभेत ज्या पक्षाचे आमदार जास्त असतात. त्या पक्षातील जेष्ठ सदस्यांची तालिका सभाध्यक्ष म्हणून अधिवेशन काळात घोषणा करण्यात येते. अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांची पावसाळी अधिवेशनाच्या तालिका सभाध्यक्ष म्हणून घोषणा झाली असून पीठासीन अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अनुपस्थितीत त्या अधिवेशानाचे कामकाज सांभाळणार आहेत.



