परतवाडा पोलिसांची कमाल: किराणा दुकान फोडीचा गुन्हा काही तासातच उघड!

परतवाडा : अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर परतवाडा शहरातील हरिओम किराणा दुकानातून झालेली १७,०५० रुपयांची चोरी उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.
परतवाडा पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांतच रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख सलीम उर्फ नायटा (वय अंदाजे ३५, रा. मुगलाईपुरा, परतवाडा) याला अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेली १७,०५० रुपये रोख रक्कम, तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल (किंमत ३०,००० रुपये) असा एकूण ४७,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात करण्यात आली असून, आरोपीविरोधात पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे आरोपी नायटा याच्यावर यापूर्वीही अनेक चोरीच्या तक्रारी दाखल असून तो सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जातो.
पोलिसांची तत्परता आणि गुप्त माहितीचे त्वरित मूल्यांकन यामुळेच हे प्रकरण काहीच वेळात उलगडण्यात यश आले, असे परतवाडा पोलीस ठाण्याच्या सुत्रांनी सांगितले.



