पंडित प्रदीप मिश्रांकडून केदारनाथ दुर्घटनेतील जयस्वाल कुटुंबाला श्रद्धांजली.

यवतमाळ : केदारनाथ येथे झालेल्या दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या वणी येथील शिवभक्त जयस्वाल कुटुंबातील सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा वणी येथे आले. मिश्रा यांनी नांदेपेरा रोडवरील राजकुमार जयस्वाल यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.
एकच झटका… संपूर्ण कुटुंब हरपले!
१५ जून २०२५ रोजी केदारनाथ येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणीचे रहिवासी राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल व त्यांच्या अडीच वर्षांची चिमुकली कन्या काशी जयस्वाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या कुटुंबाने याआधी फेब्रुवारी २०२४ मध्ये वणी शहरात पंडित मिश्रा यांच्या ‘काशी शिवमहापुराण’ कथेसाठी विशेष आयोजन केले होते.
पंडित मिश्रा भावूक… डोळ्यांतून अश्रुधारा!
वणीला पोहोचताच पंडित प्रदीप मिश्रा यांनी अत्यंत भावुक वातावरणात दिवंगत आत्म्यांना श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबले नाहीत. त्यानंतर त्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.
शिवभक्तांची गर्दी; मिश्रा यांचे दर्शन घेण्यासाठी उत्सुकता
पंडित मिश्रा यांची बातमी कळताच वणी आणि परिसरातील शेकडो शिवभक्त राजकुमार जयस्वाल यांच्या घरी दाखल झाले. मिश्रा यांचे दर्शन घेण्यासाठी परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती. संपूर्ण वातावरणात भक्तिभाव व दुःखाचे मिश्रित सूर अनुभवायला मिळाले.



