AmravatiLatest News

नालेसफाईच्या कामांची महापालिका उपायुक्तांचे विविध भागातील नाल्यांची पाहणी

अमरावती : पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर नालेसफाई तसेच इतर सर्व कामांना गती देऊन, नियोजनबद्ध पद्धतीने काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी दिले. यासाठी सातत्याने स्थळपाहणी करून पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा होईल आणि रस्ते जलमय होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी सोमवारी (ता. २३ जून रोजी) संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
अमरावती महापालिकेच्यावतीने पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालय जवळील कॅम्प परिसरातील, दस्तुर नगर रोड गानुवाडी मनोर मांगल्य, मंगल कार्यालयानजीक , व पार्वती नगर परिसरातील नाल्यांची तसेच पाणी साठणाऱ्या संभाव्य ठिकाणांची पाहणी केली. तसेच पावसाळ्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन, नागरिकांच्या घरांमध्ये नाल्याचे पाणी जाणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. नाल्याचे खोलीकरण करणे व कल्वर्ट साफ करनेच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या पाहणी दौऱ्यादरम्यान सदर परिसरातील नाल्यांची तसेच संभाव्य पाणी साठणाऱ्या भागांची पाहणी उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी केली. तसेच पूरस्थितीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा यावेळी घेण्यात आला.
शहरात पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे दरवर्षीप्रमाणे सुरू आहेत. तथापि, गाळ उपश्याच्या पलीकडे जाऊन पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती रोखणे, हा नाले स्वच्छता करण्याचा प्राधान्याने उद्देश असला पाहिजे. ही बाब लक्षात घेऊन प्रचलित कार्यपद्धतीमध्ये योग्य ती सुधारणा करावी. सर्व नाल्यांच्या बाबतीत गाळ उपसा करण्याचे नालेनिहाय आणि दिवसनिहाय नियोजन करावे. संबंधित अधिका-यांनी फक्त कार्यालयात आढावा न घेता, प्रत्यक्ष कार्यस्थळी दररोज उपस्थित राहून गाळ उपसा कामांवर योग्य देखरेख करावी, अशा स्पष्ट सूचना उपायुक्‍त डॉ.मेघना वासनकर यांनी दिल्या. तसेच नाल्यांमध्ये नागरिकांना घनकचरा फेकण्यापासून अटकाव करण्यासाठी आवश्यक त्या-त्या ठिकाणी नाल्याच्या दोन्ही बाजूला जाळी लावण्याची कार्यवाही सत्वर करावी, असे निर्देश देखील उपायुक्‍त डॉ.मेघना वासनकर यांनी दिल्‍या.

नाल्यांमध्ये घरगुती घनकचरा मोठ्या प्रमाणावर टाकल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. त्यामुळे या नाल्याची सातत्याने स्वच्छता करावी. तरंगत्या कचऱ्यामुळे पाण्याचा निचरा होण्यात अडथळा येवू नये याची दक्षता घ्यावी. नाल्याच्या एका बाजूला दुमजली घरे, दुकाने व आस्थापना आहेत. तेथून घरगुती, वाणिज्यिक कचरा नाल्यात फेकला जातो. ही बाब लक्षात घेता हा नाला एकदा स्वच्छ करून कार्यवाही पूर्ण होवू शकत नाही. एकापेक्षा अधिक वेळा नाला स्वच्छ करावा. गाळ तसेच तरंगता कचरा वारंवार काढावा. नाल्याच्या बाजूला घरांमधून कचरा फेकल्या जाण्याची समस्या आहे, अशा ठिकाणी जाळी बसवावी, अशी सूचना उपायुक्‍त डॉ.मेघना वासनकर यांनी केली.

सर्व नाल्यांच्या बाबतीत गाळ उपसा करण्याचे नालेनिहाय आणि दिवसनिहाय नियोजन करावे, विभाग कार्यालये व संबंधित यंत्रणांशी समन्वय राखावा. लहान नाले व मोठे नाले यांचे प्रवाह परस्परांवर परिणाम करतात. त्यामुळे प्रसंगी आपल्या कार्यक्षेत्रा पलीकडे जावून सर्व नाले स्वच्छ झाले आहेत, याची खातरजमा करावी, अशा सूचनाही उपायुक्‍त डॉ.मेघना वासनकर यांनी केल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख श्री योगेश कोल्हे,स्‍वास्‍थ अधिक्षक श्रीकांत डवरे, स्‍वास्‍थ निरीक्षक, मनपा कर्मचारी, उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button