कोकण आणि विदर्भात धो-धो पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून ऑरेंज व येलो अलर्ट जारी

महाराष्ट्र : राज्यात पावसाची दमदार हजेरी सुरू असून कोकण आणि घाटमाथ्यावर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर इतर भागांतही वाऱ्यांच्या झंझावातासह पावसाचा जोर दिसून येणार आहे.
- कोठे किती अलर्ट?
ऑरेंज अलर्ट: रायगड, रत्नागिरी, पुणे (घाटमाथा) - येलो अलर्ट: पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा व कोल्हापूर (घाटमाथा), पूर्व विदर्भ
- विश्रांतीचा प्रदेश: मुंबई महानगर क्षेत्र (सध्या पावसाची विश्रांती)
विदर्भातही पावसाचा इशारा
पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि भंडारा परिसरात येलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून काही भागात सकाळपासूनच हलक्या सरी सुरु आहेत.
मुंबई आणि उपनगरांत सध्या विश्रांती
शहरी भागांमध्ये गेल्या दोन दिवसांत काहीशी विश्रांती असून मुंबई, ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई येथे सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे. शनिवारी काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला होता. मात्र रस्त्यांवर वाहतुकीवर त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही.
जळगाव जिल्ह्यात शेतीची वाट पाहणारा पाऊस
जळगाव जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. काही भागांत पावसाची रिपरिप सुरू झाली असून शेतकरी वर्ग अजूनही समाधानकारक पावसाची वाट पाहत आहे. जूनच्या २२ तारखेपर्यंत अपेक्षित पर्जन्यमान न झाल्याने अनेकांनी अजूनही पेरणी थांबवून ठेवली आहे.
- हवामान विभागाचा सल्ला
ओढ्यां-नाल्यांपासून दूर राहावे - नद्या ओसंडून वाहू शकतात – स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात
- विजांच्या गडगडाटाच्या वेळेस झाडांखाली आश्रय घेणे टाळावे
- प्रवास टाळता येत असेल तर सुरक्षित ठिकाणीच थांबावे



