सौर ऊर्जा व ऊर्जा संवर्धन क्षेत्रात विद्यापीठाचे दिशादर्शक कार्य – कुलगुरू
अमरावती – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने सोलर एनर्जी काँर्पोरेशन आँफ इंडिया, नवी दिल्ली या केंद्र शासनाच्या संस्थेमार्फत वर्ष 2018 मध्ये 576 किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन केलेला असून सौर उर्जा व उर्जा संवर्धन क्षेत्रात विद्यापीठाचे कार्य दिशादर्शक असल्याचे मत कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. विद्यापीठाच्या एकूण वीज वापराच्या 55 ते 60 टक्के वीज ही या प्रकल्पातून निर्मित होत असूने 3.62 रूपये प्रति युनिट वीज दर विद्यापीठासाठी निश्चित केला आहे. वीज वितरण कंपनीचा दर 11.52 रूपये प्रति युनिट असून सौर प्रकल्पातून निर्मित होणारी वीज अतिशय स्वस्त दरात विद्यापीठाला मिळत आहे. मागील सहा वर्षात जवळपास तीन कोटी रुपयांची मोठी आर्थिक बचत झालेली आहे. याशिवाय निसर्ग संवर्धनासाठी सुद्धा विद्यापीठाने हातभार लावलेला असून सौर ऊर्जा प्रकल्पामुळे 4081 टन एवढ्या कार्बन-डाय-ऑक्साइडचे उत्सर्जन नियंत्रित झाले आहे.
वीज बचतीचे यंत्र व उपकरणांचा वापर
मागील सहा वर्षात वीज बचत करणारे बीएलडीसी सिलिंग पंखे, एलईडी ट्यूबलाइट आणि पथदिवे, पंचतारांकित यंत्रे व उपकरणे यांचा वापर विद्यापीठाने वाढविलेला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज बचत झाली आहे. विद्यापीठाचा एकुण वीज वापर 14.64 लक्ष युनिट वरुन 2024-25 मध्ये तो 13. 57 लक्ष युनिट झाला आहे. मागील सहा वर्षात इमारतींच्या, यंत्रे व उपकरणांच्या तसेच सभा व कार्यक्रमांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असतांना सुध्दा विद्यापीठाची वीज वापरात झालेली घट उल्लेखनीय आहे.
विद्यापीठातील एकूण लाईट पैकी 81 टक्के एलईडी लाईट असून 50 टक्के बीएलडीसी सिलिंग पंखे बसविण्यात आलेले आहे. शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी निधी मिळण्याकरिता वित्तीय संस्थांकडे विद्यापीठाने प्रस्ताव सादर केला असून सी.एस.आर. फंडासाठी प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठाला महाऊर्जाकडून वीज बचत करणारे एलईडी लाईट, बीएलडीसी सिलींग पंखे, पंचतारांकित वातानुकूलन यंत्रे लावण्यासाठी आतापर्यंत दोन टप्प्यांत 44 लाख रुपयांचे वित्तीय साहाय्य प्राप्त झालेले आहे. सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील असून विद्यापीठ परिसरातील निवासी इमारतींवर जवळपास 20000 लीटर क्षमतेचे सौर बंब बसविण्यात आलेले आहे. ऊर्जा अंकेक्षणाच्या अभ्यासात्मक अहवालानुसार सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता वाढविणे, ऊर्जा बचत तसेच ऊर्जा संवर्धन क्षेत्रात अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
वीज बचत करण्यासाठी आणि विजेचा गैरवापर टाळण्यासाठी कुलगुरू डॉ.मिलींद बारहाते यांनी विभागांतर्गत विजेची बचत करण्यासाठी आणि विजेचा गैरवापर टाळण्यासाठी सर्वांना आवाहन केले आहे. विद्यापीठाचा सौर ऊर्जा प्रकल्प आणि विद्युत उपकेंद्र हे आदर्श प्रकल्प असून या ठिकाणी वीज वितरण कंपनीचे प्रशिक्षणार्थी अभियंता यांची चमू तसेच इतर विद्यापीठातील मंडळी आणि इतर मान्यवर नेहमीच भेट देऊन या प्रकल्पाची माहिती जाणून घेतात व विद्यापीठाच्या कार्याची प्रशंसा करतात.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या नेतृत्वाखाली आणि प्र-कुलगुरु डॉ.महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विविध प्राधिकारीणीच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता श्री शशिकांत रोडे, विद्युत कक्षाचे उपअभियंता श्री राजेश एडले, कनिष्ठ अभियंता आकाश सोळंके व अभियांत्रिकी विभागातील सर्वच कर्मचा-यांचे प्रयत्न फलदायी ठरले आहेत.



