यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर. शाळेवरील टीन पत्रे उडाली तर महिलेच्या अंगावर छत कोसळल्याने महिला जखमी

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने नेर तालुक्यात कहर केला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका नेर तालुक्यातील बोरगाव लिंगा गावाला बसला असून, या भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गावातील अनेक घरांची छपरे उडाली असून, जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर व प्रवेशद्वारावर मोठे झाड कोसळले आहे. शाळेवरील टिन पत्रे वाऱ्याच्या झंझावातात उडून गेल्याने शाळेचे मोठे नुकसान झाले आहे.
या आपत्तीत धुरपता कोयचाडे या वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या घराचे छत कोसळल्याने त्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वादळी वाऱ्याचा तडाखा तब्बल दोन ते तीन तासांपर्यंत सुरू होता. त्यामुळे बोरगाव लिंगा गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतीचेही मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनामा करून तात्काळ मदतीची मागणी केली आहे. मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाची मदत पोहोचली नसल्याची माहिती समोर आली आहे.



