नागपुरात कळमना पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडी प्रकरणातील आरोपी अटकेत

नमस्कार, आपण पाहत आहात आमचे विशेष वृत्तांकन.
नागपुरात कळमना पोलिसांनी घरफोडी प्रकरणात मोठी यशस्वी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. चोरी गेलेला लॅपटॉप, सोन्या-चांदीचे दागिने तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून या कारवाईमुळे तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
कळमना पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चित्रशाळा नगर परिसरातील रहिवासी जुबेर मेहबुब शेख हे कुटुंबासह लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून लॅपटॉप, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि घड्याळ असा सुमारे 72 हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरी करून नेला होता.
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला आरोपींकडून चोरी गेलेला एचपी कंपनीचा लॅपटॉप जप्त करण्यात आला.
यानंतर न्यायालयाकडून पोलिस कोठडी मिळाल्यानंतर आरोपींची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या कबुलीनुसार सोन्याचे कानातील झुमके, लेडीज अंगठी, चांदीच्या अंगठ्या, चेन आणि पायातील जोडवे असा चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. घरफोडीसाठी वापरण्यात आलेली हिरो स्प्लेंडर दुचाकी ही देखील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. तसेच आणखी एक हिरो पॅशन प्रो दुचाकीही पोलिसांनी हस्तगत केली आहे.
या कारवाईत लॅपटॉप, सोन्या-चांदीचे दागिने आणि दोन दुचाकींसह एकूण 1 लाख 34 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तपासामुळे घरफोडी आणि वाहन चोरीसह एकूण तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कळमना पोलिसांच्या पथकाने केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. पुढील तपास सुरू आहे.



