Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsDharmikFestival NewsLatest NewsMaharashtra

सावंगा विठोबा येथे ७२ फूट झेंड्यांचा थरारक सोहळा; गुढीपाडव्याला भक्तांची मोठी गर्दी

अमरावती जिल्हा मधील चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे गुढीपाडव्याच्या पवित्र मुहूर्तावर एक नेत्रदीपक आणि थरारक सोहळा पार पडला… तब्बल ७२ फूट उंच झेंड्यांना नवीन खोळ चढविण्याचा अनोखा धार्मिक विधी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला…


श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडवा ते रामनवमी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. १८ ते २७ मार्चदरम्यान सुरू असलेल्या या यात्रेला विदर्भासह राज्यभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे…

गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रेचे मुख्य आकर्षण ठरलेला ७२ फूट उंच झेंड्यांना नवीन खोळ चढविण्याचा सोहळा पार पडला… टाळ-मृदंगाच्या गजरात, अखंड कापूर ज्योती आणि “विठ्ठल विठ्ठल”च्या नामघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता…

या सोहळ्यावेळी झेंड्यांना पायाचा स्पर्श होऊ नये यासाठी विशेष काळजी घेत दोरांच्या सहाय्याने जुनी खोळ काढून नवीन खोळ चढविण्यात आली… हा परंपरागत विधी संस्थानचे विश्वस्त चरणदास कांडलकर यांच्या हस्ते विधीवत पूजन करून पार पडला…

अवधूत भजन मंडळांच्या सुमधूर भजनांनी वातावरण अधिकच भारावून गेले होते… यात्रेदरम्यान शेकडो क्विंटल कापूर विक्री झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे…

महोत्सवाची सुरुवात १८ मार्च रोजी अमावस्येनिमित्त चंदन-उटी आणि रमणा कार्यक्रमाने झाली… यात्रेदरम्यान भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्नदान, भव्य मंडप आणि सावलीची सोय करण्यात आली आहे…

तसेच २० ते २७ मार्चदरम्यान दररोज प्रवचनांचे आयोजन करण्यात आले असून २६ मार्च रोजी रामनवमी उत्सव, तर २७ मार्च रोजी महाप्रसाद, पालखी आणि ढालीचा सोहळा पार पडणार आहे…


अशा या भक्तिमय वातावरणात पार पडणाऱ्या सावंगा विठोबा यात्रेने पुन्हा एकदा श्रद्धा आणि परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळतोय…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button