citynewsLatest NewsMaharashtraMorsi Warud

मोर्शीत बिबट्याचा हल्ला; शेतातील गोऱ्याला फरफटत नेऊन ठार

मोर्शी तालुक्यातील नया वाठोडा परिसरात शेतात बांधलेल्या गोऱ्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला फरफटत नेऊन ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे… या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं सावट पसरलं असून शेतकरी वर्गात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे…


मोर्शी शहरालगत असलेल्या नया वाठोडा आणि पुसला शेतशिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे… त्यामुळे आधीच शेतकरी चिंतेत असताना आता प्रत्यक्ष हल्ल्याची घटना समोर आली आहे…

नया वाठोडा येथील शेतकरी पुरुषोत्तम काकडे यांच्या शेतात कुक्कुटपालन आणि जनावरे ठेवली जातात… उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे त्यांनी आपली जनावरे निंबाच्या झाडाखाली बांधून चारा-पाणी करून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरी परतले…

मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ते आपल्या मुलासह शेतात पोहोचले असता… त्यांना गोरा दिसून आला नाही… फक्त गळ्याचा दोर तुटलेल्या अवस्थेत आढळून आला… यानंतर त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता… जमिनीवरून ओढत नेल्याच्या खुणा दिसून आल्या…

त्या खुणांचा माग काढत गेल्यावर सुमारे ६० ते ७० फूट अंतरावर गोऱ्याचा मृतदेह आढळून आला… बिबट्याने गोऱ्याच्या मागील बाजूस आणि पोटाचा भाग खाल्ल्याचे स्पष्ट दिसून आले…

ही घटना बुधवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली… घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी आणि वनरक्षक निखिल गोरे यांना तात्काळ कळवण्यात आले…

दरम्यान… शेजारील शेतकरी रामचंद्र अमझरे यांच्या मुलानेही एक महत्त्वाची माहिती दिली आहे… मंगळवारी सायंकाळी सहा वाजता तो बैलजोडी घेऊन घरी जात असताना त्याला बिबट्याची डरकाळी ऐकू आली… त्या आवाजाने बैल घाबरून पळू लागले… मात्र अशा आवाजांचा अनुभव असल्यामुळे त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याचं सांगितलं…

या घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे… रात्रीचं सोडाच, आता दिवसाढवळ्याही शेतात जाणं धोकादायक झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे…

वनविभागाने तात्काळ पावलं उचलून बिबट्याला पकडावं आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे…


नया वाठोडा परिसरातील ही घटना निश्चितच चिंताजनक आहे… वन्य प्राण्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्तीशी वाढलेला संपर्क ही गंभीर समस्या बनत चालली आहे… वनविभाग यावर कितपत प्रभावी कारवाई करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button