नागपुरातील सचिन साहू हत्याकांडात मोठी घडामोड; मुख्य आरोपी सीटू सरदारला पुन्हा पोलीस कोठडी

नागपूर शहराला हादरवून सोडणाऱ्या सचिन साहू हत्याकांडात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सीटू सरदार याला पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, तपासाला वेग आला आहे… विशेष म्हणजे आरोपीची भररस्त्यात धिंड काढत त्याला घटनास्थळी नेण्यात आले…
नागपूरातील गाजलेल्या सचिन साहू हत्याकांडाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. यशोधरानगर पोलीस स्टेशन पोलिसांनी मुख्य आरोपी सीटू सरदार याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस कोठडी मिळताच तपास यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये आली… आरोपी सीटू सरदारला थेट त्या परिसरात नेण्यात आले, जिथे ही थरारक हत्या घडली होती. गुन्ह्याची साखळी उलगडण्यासाठी आणि घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पोलिसांनी आरोपीची भर बाजारात पायी धिंड काढली.
यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती… अनेकांनी या घटनेचे व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केले.
दरम्यान, या हत्येमागे जुना वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत सचिन साहू हे भाजपचे स्थानिक वॉर्ड अध्यक्ष होते. घटनेच्या दिवशी ते आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसासाठी खरेदी करण्यासाठी बाहेर पडले होते. मात्र, याच वेळी हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात आरोपी सीटू सरदारने ५ मार्च रोजी न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता १० मार्च रोजी त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली आणि त्याला पुन्हा ताब्यात घेतले.
सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या चौकशीतून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागपूरमधील या गाजलेल्या हत्याकांडात तपासाची चक्रे वेगाने फिरताना दिसत आहेत… आरोपीची धिंड, मकोका अंतर्गत कारवाई आणि पोलिसांचा आक्रमक तपास… यामुळे येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे…



