रामटेकमध्ये रेती माफियांवर पोलिसांचा धडाका; ३.४८ कोटींचा मुद्देमाल जप्त

नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील रामटेक येथे पोलिसांनी रेती माफियांविरोधात मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल ३ कोटी ४८ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत ७७ ब्रास अवैध रेती आणि ७ वाहने जप्त करण्यात आली असून, एकूण ७ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
दिनांक १७ मार्च २०२६ रोजी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक, स्थानिक पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकांनी नाकाबंदी व पेट्रोलिंग करत ही मोहीम राबवली.
👉 तुमसर–रामटेक मार्गावर राखी तलाव जवळ नाकाबंदी दरम्यान दोन वाहने पकडण्यात आली. या वाहनांमधून २७ ब्रास अवैध रेती जप्त करण्यात आली असून सुमारे १ कोटी ११ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
👉 त्यानंतर नगरधन फाटा, राखी तलाव परिसर आणि शितलवाडी येथे सखोल तपासणी करत चार मोठी वाहने ताब्यात घेण्यात आली. या वाहनांमधून ४० ब्रास रेती जप्त करण्यात आली असून सुमारे २ कोटी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
👉 याशिवाय रामटेक पोलिसांनी स्वतंत्र कारवाई करत एक टिप्पर पकडून १० ब्रास रेती आणि ३५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या संपूर्ण कारवाईत एकूण ७ गुन्हे नोंद करण्यात आले असून आरोपींविरुद्ध विविध कायद्यांनुसार कारवाई सुरू आहे. या धडाकेबाज ऑपरेशनमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
अवैध रेती तस्करीवर पोलिसांनी घेतलेली ही कडक भूमिका परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.



