उत्तर प्रदेशात भीषण अपघात; भरधाव स्कॉर्पिओने 10 मीटरमध्ये 3 जणांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात बुधवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालगढ़ी परिसरात जलेसरहून रजावलीकडे जाणारी भरधाव स्कॉर्पिओ कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. रस्त्याच्या कडेला चालत असलेल्या एका तरुणाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला आणि कारने प्रथम एका दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर कारने एका पादचारीलाही चिरडले.
अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला असून कारही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहे. या अपघातात बबलू शर्मा (32), रचना (30) आणि दिगंबर (55) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालक सतेंद्र हा गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमी चालकाला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.



