मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, वाहतूक ठप्प

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर आज सकाळी खोपोलीजवळील नवीन बोगद्यात भीषण अपघात झाला असून यात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर किमान *४ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ४ ते ५ वाहनांची साखळी धडक झाली. या अपघातात कार, कंटेनर आणि टँकर एकमेकांवर जोरात आदळले. धडक इतकी भीषण होती की एका कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.
अपघातानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक प्रवासी या ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
या बचावकार्यामध्ये आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस स्टेशन, महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला आहे.
दरम्यान, पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.



