तिवसा तालुक्यातील राखीव जंगलात भीषण आग; वनसंपत्ती धोक्यात, प्रशासन युद्धपातळीवर

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. वनविभागाच्या राखीव क्षेत्रात भीषण आग भडकली असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
ही घटना तिवसा तालुक्यातील वनविभागाच्या राखीव जंगल क्षेत्रात घडली आहे. आज अचानक या जंगल परिसरात आग लागली आणि काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले.
या आगीमुळे मोठ्या प्रमाणात झाडे, वनस्पती आणि नैसर्गिक संपत्ती जळून खाक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीचे लोळ दूरवरून दिसत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच तिवसा नगरपंचायतीचे अग्निशमन दल तात्काळ सज्ज झाले असून पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि वन विभागही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून आग नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
सध्या आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. ही आग नैसर्गिक कारणांमुळे लागली की मानवी निष्काळजीपणामुळे, याचा तपास सुरू आहे.
या भीषण आगीमुळे वनसंपत्तीला मोठा धोका निर्माण झाला असून, परिस्थिती नियंत्रणात आणणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरले आहे. पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा सिटी न्यूज.



