यवतमाळात खून प्रकरणाचा 24 तासांत उलगडा; अनैतिक संबंधातून पती-पत्नीने केली हत्या

यवतमाळ जिल्ह्यातील लाडखेड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा लावत पती-पत्नीला अटक केली आहे. एकतर्फी अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नेर मार्गावरील लासीना-वाघापूर शेतशिवार परिसरात गॅस गोदामाजवळ 15 मार्च रोजी सकाळी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहावर चाकूने वार केल्याच्या खुणा तसेच दगडाने ठेचल्याचे स्पष्ट दिसत होते. याशिवाय डोळ्यांत तिखट टाकण्यात आल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
तपासादरम्यान मृताची ओळख आतिश सुभाषराव देशमुख (वय 36, रा. गोविंद नगर, यवतमाळ) अशी पटली. याप्रकरणी मृताचे काका पंजाबराव देशमुख यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाईल कॉल डिटेल्स आणि शेवटच्या संपर्काच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. या तपासात अंकुश खोडे (वय 43) आणि त्यांची पत्नी रुपाली खोडे (वय 38, रा. दांडेकर लेआउट, यवतमाळ) यांच्यावर संशय बळावला.
दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तपासात उघड झाले की, मृतक आतिश देशमुख याचे रुपाली खोडे हिच्याशी पूर्वी संबंध होते. संबंध तुटल्यानंतरही आतिश तिच्यावर संपर्क ठेवण्यासाठी दबाव टाकत होता आणि तिच्या पतीला जिवे मारण्याच्या धमक्या देत होता.
या सततच्या त्रासाला कंटाळून पती-पत्नीने संगनमताने 14 मार्च रोजी आतिशला वाघापूर शेतशिवारात बोलावले. तेथे त्याच्यावर चाकूने वार करून आणि दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली. गुन्हा लपवण्यासाठी डोळ्यांत तिखट टाकण्यात आल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वैयक्तिक वादातून वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.



