पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात: टायर फुटल्याने क्रुझरची ट्रकला धडक, तिघांचा जागीच मृत्यू

इंदापूर — आज सकाळी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर परिसरात एक भीषण अपघात घडला असून यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेगात धावणाऱ्या क्रुझर जीपचा अचानक टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर गाडी रस्ता दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकला जोरात धडकली. धडक इतकी भीषण होती की क्रुझरमधील चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातग्रस्त तिघेही लोणी देवकर एमआयडीसीमधील एका खासगी कंपनीत काम करणारे कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून ती निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
अपघातानंतर काही काळ महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले असून अपघातग्रस्त वाहनं जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



