अमरावतीत MSRTC बसमध्ये अपंग महिलेला सीट नाकारल्याचा आरोप; प्रवाशांमध्ये संताप

Maharashtra State Road Transport Corporation च्या अमरावती डेपोमधून धावणाऱ्या बसमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे… अपंग महिलेला राखीव सीटवर बसण्यास मज्जाव करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे…
Amravati डेपोमधून अमरावती–आसेगाव–असतपुर मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये पार्सल ठेवण्यात आले असल्याचे कारण देत समोरील सीटवर बसण्यास एका अपंग महिलेला मज्जाव करण्यात आला. ही सीट विशेषतः अपंग आणि गरजू प्रवाशांसाठी राखीव असतानाही संबंधित महिलेला बसू दिले नाही.
यावेळी बस कर्मचाऱ्यांनी त्या महिलेशी उडवाउडवीची आणि अयोग्य भाषेत वागणूक दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, त्या महिलेसोबत तिची दोन लहान मुलेही होती, त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली.
या घटनेमुळे बसमधील इतर प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून, अपंग प्रवाशांसोबत अशी वागणूक अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
प्रवाशांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली असून, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
अपंग प्रवाशांसाठी राखीव सुविधा असूनही त्यांच्याशी अशा प्रकारची वागणूक दिली जात असल्याचे चित्र चिंताजनक आहे… आता प्रशासन यावर काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे…



