citynewsLatest NewsMaharashtraYavatmal

यवतमाळच्या आर्णीत बिबट्याचे कुजलेले अवशेष आढळले; दात-नख काढल्याने शिकारीचा संशय

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावळी सदोबा वन परिसरात एका बिबट्याचे कुजलेल्या अवस्थेतील अवशेष आढळून आल्याने वन विभागात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या बिबट्याचे दात आणि नख काढण्यात आल्याचे समोर आल्याने वन्यजीव शिकारीची शक्यता व्यक्त केली जात आहे.


ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्र अंतर्गत सावळी सदोबा जंगल परिसरात उघडकीस आली आहे. वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार वरुड शेत वर्तुळ परिसरात एका बिबट्याचे कुजलेल्या अवस्थेतील अवशेष आढळले.

प्राथमिक अंदाजानुसार या बिबट्याचा मृत्यू सुमारे १५ दिवसांपूर्वी झाला असावा, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

घटनास्थळी तपास करताना बिबट्याचे दात आणि नख काढण्यात आल्याचे दिसून आले. तसेच काही अंतरावर प्लास्टिकच्या पिशवीत त्याचे काही अवशेष सापडल्यामुळे वन्यजीव शिकारीचा संशय अधिक बळावला आहे.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक तौर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोशन मेहर, वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रशेखर भोजने, वर्तुळ क्षेत्र सहाय्यक मनोज घोडमारे तसेच वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

वन विभागाने घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याचे अवशेष पुढील तपासणी आणि शवविच्छेदनासाठी नागपूर येथे पाठवले आहेत.

सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून हा मृत्यू नैसर्गिक आहे की शिकारीमुळे झाला आहे, याचा तपास वन विभाग करत आहे.


या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वन्यजीव संरक्षणाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता तपासातून नेमके सत्य काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button