भरधाव कारची दुचाकीला धडक; अमरावतीत भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू, एक मुलगी गंभीर

अमरावतीच्या जुन्या बायपास रोडवर रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आनंद मार्बल फॅक्टरीसमोर भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघेही हवेत उडून रस्त्यापासून सुमारे ५० ते ६० फूट दूर फेकले गेले.
या अपघातात गजानन श्रीराम माकोडे (वय ५५) आणि त्यांची मोठी मुलगी सपना माकोडे (वय २४) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुसरी मुलगी प्रियंका माकोडे (वय २३) गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन माकोडे हे आपल्या दोन मुलींसह दुचाकीने जुन्या बायपास रोडवरून जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि कार अतिशय वेगात होती. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फरार कार चालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



