आखाती युद्धाचा परिणाम! सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जागतिक बाजारावर होत असून त्याचे पडसाद सोनं-चांदीच्या दरावरही उमटताना दिसत आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या तणावामुळे इंधनाच्या किमतीत वाढ झाली असली तरी मौल्यवान धातूंच्या दरात मात्र सतत चढ-उतार होत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सराफा बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे.
सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफा बाजारात आज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली. सोन्याच्या दरात सुमारे १ हजार रुपयांची तर चांदीच्या दरात सुमारे ४ हजार रुपयांची घट झाली आहे. सध्या जीएसटीसह सोन्याचा दर सुमारे १ लाख ६१ हजार १९५ रुपये इतका झाला आहे. तर एक किलो चांदीचा दर जीएसटीसह २ लाख ६३ हजार ६८० रुपयांवर आला आहे. दर घसरल्याने सराफा बाजारात ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
दरम्यान, ‘गुड रिटर्न्स’ने दिलेल्या माहितीनुसार देशभरातही आज सोनं-चांदीच्या किमतीत घट झाली आहे. २४ कॅरेटच्या एका तोळा सोन्याच्या दरात ४९० रुपयांची घसरण होऊन तो १ लाख ५९ हजार १७० रुपयांवर आला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरात ४५० रुपयांची घट होऊन तो १ लाख ४५ हजार ९०० रुपयांवर पोहोचला आहे. तसेच १८ कॅरेट सोन्याच्या दरात ३६० रुपयांची घसरण होऊन तो १ लाख १९ हजार ३८० रुपयांवर आला आहे.
याचबरोबर चांदीच्या दरातही मोठी घट झाली असून एका किलो चांदीच्या किमतीत तब्बल ५ हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सध्या एक किलो चांदीचा दर सुमारे २ लाख ७० हजार रुपयांवर आला आहे. दरातील या घसरणीमुळे आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोनं-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची मागणी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.



