अमरावतीत एमडी ड्रग्सवर मोठी कारवाई; ११ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

अमरावती शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एमडी म्हणजेच मॅफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणणाऱ्या आरोपींना अटक करत पोलिसांनी तब्बल ११ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अमरावती शहर गुन्हे शाखेला १४ मार्च २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली की, मुंबईहून एक व्यक्ती अमरावती शहरात एमडी म्हणजेच मॅफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येत आहे.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील नवी वस्ती येथील सर्किट हाऊस परिसरात सापळा रचला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद रफीक मोहम्मद सलीम (वय ४२, रा. अंधेरी वेस्ट, मुंबई) आणि सोहेल खान फिरोज खान (वय २६, रा. छाया नगर, अमरावती) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींकडून ७६ ग्रॅम एमडी (मॅफेड्रोन) हा अंमली पदार्थ जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत ११ लाख ४० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून इतर काही आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने १८ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, “एमडी मुक्त अमरावती” हा संकल्प पूर्ण करण्यासाठी अमरावती पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात सातत्याने कठोर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



