Accident NewsLatest NewsLatur

धाराशिव-लातूर-तुळजापूर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, चार जण गंभीर

धाराशिव-लातूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. बोलेरो, वॅगनार आणि होंडा सिटी या तीन कार एकमेकांवर धडकून झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की तिन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला.

ही दुर्घटना करजखेडा पाटीजवळ घडली. प्राथमिक माहितीनुसार बोलेरो गाडी अतिवेगाने येत होती. करजखेडा पाटीजवळ पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बोलेरोने समोरून येणाऱ्या वॅगनार कारला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर बोलेरो पलटी झाली आणि दुभाजक ओलांडून समोरच्या लेनमध्ये गेली.

दरम्यान समोरून येणाऱ्या होंडा सिटी कारने पलटी झालेल्या बोलेरोला जोरदार धडक दिल्याने तिहेरी अपघात झाला. या धडकेत तिन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला असून महामार्गावर रक्ताचा सडा पडलेला दिसत होता.

या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनांमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. तर चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी धाराशिव आणि सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button