बडनेरा येथील सेंट जॉर्ज चर्चमध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; वाद चिघळला

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील सेंट जॉर्ज चर्चमध्ये आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे वाद चिघळल्याचे समोर आले आहे. चर्चच्या माजी कोषाध्यक्षांनी पास्टरेट कमिटीवर गंभीर आरोप करत नागपूर डायसकडे तक्रार केली आहे. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील सेंट जॉर्ज चर्चमध्ये आर्थिक अनियमिततेच्या आरोपांमुळे चर्च प्रशासनात वाद निर्माण झाला आहे.
चर्चच्या माजी कोषाध्यक्ष ललिता रगबनसिंग यांनी दिलेल्या प्रेस नोटनुसार, गेल्या पाच वर्षांपासून पास्टरेट कमिटीमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात पास्टरेट कमिटीच्या सचिव मनीषा रगबनसिंग, कोषाध्यक्ष सुशिल काळे तसेच सदस्य सुनिता कांबळे, अमोल शेळके आणि कल्पना कर्नेलेस यांच्यावर चर्चच्या निधीचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
ललिता रगबनसिंग यांच्या म्हणण्यानुसार, या गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. या वादातून दोन्ही बाजूंनी पोलिसांत तक्रारीही दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात कागदोपत्री पुरावे आपल्या ताब्यात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
चर्चची पवित्रता आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी सध्याच्या समितीला तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी नागपूर डायसकडे केली आहे. मात्र वारंवार निवेदन देऊनही वरिष्ठांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे बडनेरा परिसरातील ख्रिस्ती बांधवांमध्ये खळबळ उडाली असून नागपूर डायसकडून अधिकृत प्रतिक्रिया काय येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य समोर यावे, अशी मागणी स्थानिक भाविकांकडून होत आहे. नागपूर डायस प्रशासन यावर काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



