नागपूर जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ट्रॅक्टरसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रामटेक तालुक्यातील देवलापार परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रॅक्टरसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक उपविभागात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीच्या आधारे अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मौजा चोरबाहुली येथील नाल्याजवळ नाकाबंदी केली. यावेळी ट्रॅक्टर क्रमांक MH-40-BJ-3943 आणि त्याला जोडलेली विनाक्रमांकाची ट्रॉली अडवून तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान ट्रॉलीमध्ये रेती आढळून आली. ट्रॅक्टर चालक नितेश वासुदेव उईके (वय ३२, रा. सोनेघाट, ता. रामटेक) याच्याकडे रेती वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले.
चौकशीदरम्यान ट्रॅक्टरचा मालक देवचंद देवाधारी (रा. मरारवाडी, ता. रामटेक) असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी पंचासमक्ष ट्रॅक्टर, विनाक्रमांकाची ट्रॉली आणि एक ब्रास रेती असा एकूण ५ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तसेच खाण व खनिज अधिनियम अंतर्गत देवलापार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अवैध रेती तस्करीवर पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीवर पुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.



