नागपुरात ‘मुलं चोरी’च्या अफवेवरून वृद्ध महिलेला मारहाण; पोलिसांनी वाचवले

नागपूरमधील हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रायपूर परिसरात मुलं चोरीच्या अफवेवरून एका वृद्ध महिलेला जमावाने मारहाण केल्याची घटना घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपूरमधील रायपूर परिसरातील नेहरू विद्यालयाजवळ ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ६० वर्षीय वृद्ध महिला एका चार वर्षांच्या मुलीशी बोलण्याचा आणि पाणी मागण्याचा प्रयत्न करत होती. त्या महिलेच्या हातात प्लास्टिकची पिशवी आणि काही औषधे होती.
मात्र परिसरातील काही लोकांना आणि त्या मुलीच्या आईला गैरसमज झाला की ही महिला मुलीला शांत करून बॅगेत टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर “मुलं चोरी करणारी महिला” अशी अफवा परिसरात पसरली आणि काही क्षणातच मोठा जमाव तेथे जमा झाला.
जमावाने त्या वृद्ध महिलेला घेरले आणि काही महिलांनी तिच्यावर मारहाण देखील केली. दरम्यान, माहिती मिळताच हिंगणा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्या महिलेला जमावापासून सुरक्षित बाहेर काढले.
पोलिसांच्या तपासात समोर आले की, संबंधित महिला मानसिकदृष्ट्या आजारी असून ती आपला रस्ता चुकली होती. ती मागील सुमारे ३० वर्षांपासून इसासनी परिसरात राहत असून तिला मुले आणि नातवंडेही आहेत. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की ही महिला मुलं पळवणारी नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, या घटनेचा ‘बाळ चोरी’ असा चुकीचा मजकूर देऊन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
नागपूर पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन केले आहे.
सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवा किती धोकादायक ठरू शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची खातरजमा करणे अत्यंत गरजेचे असल्याचे पोलिसांनी नागरिकांना सांगितले आहे.



