नागपुरात घरफोडी व वाहन चोरीचा उलगडा; दोन विधीसंघर्ष बालकांच्या ताब्यातून ७.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूरमध्ये गुन्हे शाखा युनिट क्रमांक ५ ने मोठी कारवाई करत घरफोडी आणि वाहन चोरीच्या दोन गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. पोलिसांनी दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेत तब्बल ७ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा गुन्हे शाखा युनिट क्रमांक ५ ने केला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक १३ मार्च रोजी पेट्रोलिंग करत असताना संशयावरून दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून दोन दुचाकी वाहनांसह मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. तपासादरम्यान हे दागिने घरफोडीच्या गुन्ह्यातील असल्याचे समोर आले.
या कारवाईत सुमारे ७८.०८ ग्रॅम सोने, १४४.४३ ग्रॅम चांदी, दोन दुचाकी वाहने आणि एक मोबाईल असा एकूण ७ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या विधीसंघर्ष बालकांना पुढील कारवाईसाठी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणातील दोन गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या टोळीवर मोठा आळा बसल्याचे मानले जात आहे. पुढील तपास हुडकेश्वर पोलीस ठाणे करत आहे.



