कामरगावात डॉक्टरकडून ‘बालरोग तज्ज्ञ’ असल्याचा दावा; आरोग्य विभागाकडून नोटीस

कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे एका डॉक्टरने स्वतःला बालरोग तज्ज्ञ म्हणून दर्शवत वैद्यकीय व्यवसाय केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीएएमएस पदवी असतानाही दवाखान्याच्या फलकावर ‘बालरोग तज्ज्ञ’ असा उल्लेख केल्याने आरोग्य विभागाने संबंधित डॉक्टरला नोटीस बजावली आहे.
ही घटना कामरगाव येथे उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉ. गणेश ओव्हर यांनी आपल्या दवाखान्याच्या फलकावर बीएएमएस अशी शैक्षणिक पात्रता नमूद करत त्याखाली ‘बालरोग तज्ज्ञ’ असा उल्लेख केला होता.
या बाबत माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेतली. आरोग्य विभागाच्या मते, आवश्यक शैक्षणिक पात्रता नसताना स्वतःला तज्ज्ञ डॉक्टर म्हणून दर्शवणे ही भ्रामक माहिती देण्यासारखी बाब असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
याप्रकरणी संबंधित डॉक्टरविरुद्ध महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अधिनियम १९६१ अंतर्गत कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा मागवण्यात आला आहे.
दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शंकर नांदे यांनी सांगितले की संबंधित डॉक्टरला सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र ते सध्या बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणाची पुढील दोन दिवसांत सखोल चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



