अमरावतीत तीन नवीन पोलीस ठाण्यांची मागणी; विधानसभेत सुलभाताई खोडके यांचा प्रश्न

अमरावती शहराच्या वाढत्या विस्तार आणि लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा विधानसभेत उपस्थित करण्यात आला आहे. आमदार सुलभाताई खोडके यांनी अमरावतीत तीन नवीन पोलीस ठाण्यांची गरज असल्याचे सांगत तपोवन, साई नगर आणि एमआयडीसी परिसरात नवीन पोलीस स्टेशन सुरू करण्याची मागणी केली आहे.
अमरावती शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना वाढत्या लोकसंख्येमुळे कायदा व सुव्यवस्थेवर ताण वाढत असल्याचा मुद्दा आमदार सुलभाताई खोडके यांनी विधानसभेत उपस्थित केला.
शहराच्या सुरक्षेसाठी तपोवन, साई नगर आणि एमआयडीसी परिसरात नवीन पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाने तातडीने मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
यासोबतच शहरातील सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्तावही प्रलंबित असल्याचे त्यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले. गुन्हेगारी रोखण्यासाठी गुन्हे शाखेसोबत स्थानिक पोलीस ठाण्यांची कारवाई वाढवण्याचीही त्यांनी मागणी केली.
विशेषतः एमडी ड्रग्सच्या तस्करीवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नवीन वसाहती उभारण्याची मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, अमरावती शहरातील २८ वर्षांपासून रखडलेल्या भुयारी गटार योजनेचाही मुद्दा त्यांनी विधानसभेत मांडला. या योजनेसाठी सुमारे २५०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून शहरातील स्वच्छतेसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
या सर्व विषयांवर मंत्रालय स्तरावर तातडीने बैठक घेऊन प्रस्तावांना मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार सुलभाताई खोडके यांनी शासनाकडे केली.
अमरावती शहराच्या विकास आणि सुरक्षेसाठी विधानसभेत हा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला आहे. आता शासन या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.



