Accident NewsAkolacitynewsEducation NewsLatest NewsMaharashtra

अकोल्यात मध्यरात्री भीषण आग; सिटी कोतवाली परिसरातील ५ ते ७ दुकाने जळून खाक, घातपाताचीही शक्यता

अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. पाहता पाहता परिसरातील ५ ते ७ दुकाने जळून खाक झाली. मात्र ही आग केवळ अपघात आहे की यामागे काही घातपाताचा कट आहे, याबाबत शहरात चर्चा सुरू झाली आहे. कारण ज्या ठिकाणी ही आग लागली, त्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पाहूया या घटनेचा सविस्तर आढावा.


अकोल्यातील सिटी कोतवाली परिसरातील या भीषण आगीच्या ज्वाळा पहा. रात्री साधारण दोन वाजताच्या सुमारास, संपूर्ण शहर झोपेत असताना अचानक या दुकानांमधून धूर आणि आगीच्या लपेटा बाहेर येऊ लागल्या. रेडीमेड कपड्यांचे दुकान, फ्रेमिंग दुकान तसेच ‘बिंदिया घर’सह परिसरातील ५ ते ७ दुकाने काही क्षणांतच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

आग इतकी भीषण होती की दुकानांत ठेवलेल्या दोनपेक्षा अधिक गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आणि त्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. या ठिकाणाजवळच दर्गा असल्याने प्रशासनाचीही मोठी धावपळ उडाली. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या, मात्र अरुंद रस्ते आणि वारंवार होणारे सिलेंडर स्फोट यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांना मोठी कसरत करावी लागली.

या आगीत दुकानांमधील मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या आगीमुळे शहरात अनेक शंका-कुशंका निर्माण झाल्या आहेत.

विशेष म्हणजे, ज्या ‘बिंदिया घर’ दुकानाला आग लागली त्या दुकानाच्या मालकाविरुद्ध काही दिवसांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर महानगरपालिकेकडून या परिसरात अतिक्रमण हटाव मोहीमही राबवण्यात आली होती. अतिक्रमणाच्या यादीत असलेल्या दुकानांनाच आग लागल्याने ही घटना घातपाताची असू शकते, अशीही चर्चा शहरात रंगू लागली आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.


अकोल्यातील या आगीच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही आग केवळ सिलेंडर स्फोटामुळे लागलेली दुर्घटना होती की अतिक्रमण आणि सुरू असलेल्या वादातून घडवून आणलेला घातपात? याचे उत्तर पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button