BhandaracitynewsIndia NewsLatest NewsMaharashtra

लग्नाच्या चार दिवस आधी नवरदेवाची आत्महत्या; भंडाऱ्यातील परसोडी गावावर शोककळा

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील परसोडी-पावळदवना येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या चार दिवस आधी नवरदेवाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. लग्नाच्या घरात आनंदाचे वातावरण असताना अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश अविनाश भेंडारकर (वय २७) या युवकाने पहाटेच्या सुमारास गावाजवळील आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. राजेश भेंडारकर हे मागील तीन वर्षांपासून डालमिया ग्रुपच्या चंद्रपूर येथील प्रकल्पात सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होते.

विशेष म्हणजे येत्या १६ मार्च रोजी एरंडी येथील वैष्णवी राजू दोनोडे यांच्याशी त्यांचा विवाह होणार होता. लग्नाच्या अवघ्या चार दिवस आधी ही दुर्दैवी घटना घडल्याने कुटुंबीयांसह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या तयारीसाठी नवरी ११ मार्च रोजी मुलाच्या घरी आली होती आणि घरात लग्नाची लगबग सुरू होती. मात्र अचानक राजेश यांनी असे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र पोलिसांतर्गत पालांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पालांदूर पोलीस करीत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परसोडी गावात शोककळा पसरली असून गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button